गुटखा बंदी वर्षभरासाठीच

July 12, 2012 12:14 PM0 commentsViews: 81

12 जुलै

अखेर संपूर्ण राज्यात गुटखाबंदी पुढील आठवड्यात लागू होणार आहे. अन्न औषध प्रशासनाने गेल्या वर्षभरात 1173 पानमसाला आणि गुटख्यांचे नमुने तपासले त्यापैकी 853 नमुन्यांमध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट मोठ्या प्रमाणात आढळले त्यामुळे सार्वजनिक हितासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचं सांगत मनोहर नाईक यांनी गुटखाबंदीची घोषणा केली आहे. ही बंदी एक वर्षासाठी असेल. गुटकाबंदीचा कालवधीपूर्ण होण्याच्या आधीच पुन्हा गुटखा बंदीला मुदतवाढ देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अन्न सुरक्षा विधेयक 2006 अन्वये ही बंदी लागू करण्यात आली आहे. काल बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे राज्य सरकारचा 100 कोटींचा महसूल बुडणार आहे. तसेच यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट असलेल्या सर्व पदार्थांवर कडक बंदी घालण्यात आली आहे. गुटखा सेवन करणे, विक्री करणे या सर्वांवर बंदी घालण्यात आली आहे. मॅग्नेशियम कार्बोनेट हा आरोग्याला अतिशय हानिकारक पदार्थ आहे. त्यामुळे इतर कोणत्याही गुटखा अथवा पानमसाला सारख्या पदार्थात जर मॅग्नेशियम कार्बोनेट आढळून आलेल्या पदार्थांवर सुध्दा बंदी लागू केली आहे. गुटखा बंदीच्या निर्णयात देशात महाराष्ट्र राज्य हे तिसरे राज्य ठरले आहे.

गुटखाबंदी

- मॅग्नेशियम कार्बोनेट असलेल्यामुळे गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी- गुटख्याचं उत्पादन, वितरण, विक्री आणि साठा करणं गुन्हा असेल- बंदी मोडणार्‍यास 6 महिने ते 3 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद- सरकारचा 100 कोटी रुपयांचा महसूल बुडणार- गुटख्यावर बंदी घालणारं महाराष्ट्र चौथं राज्य- पान मसाल्यावर बंदी घालणारं महाराष्ट्र पहिलं राज्य

सरकारच्या या निर्णयाचं राज्यभरातून लोकांनी स्वागत केलंय. यापूर्वी 2002 मध्ये घातलेली राज्य सरकारने गुटख्यावर बंदी घातली होती. पण ती सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवली होती. आता गुटखा उत्पादक पुन्हा एकदा या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.

पण खरा मुद्दा आहे तो अंमलबजावणीचा. कारण याबद्दलचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला नाहीये. यापूर्वी सरकारने शैक्षणिक परिसरात तंबाखुवर बंदी घातली होती, पण त्याची अंमलबजाणी झाली नाही. आतापासूनच गुटख्याच्या काळ्या बाजाराला सुरुवात झाली आहे. हे मोडून काढणं सरकारी यंत्रणेसमोरचं मोठं आव्हान असेल.

close