पैठणमध्ये 9 कोटींचा वाळू साठा जप्त

July 12, 2012 1:03 PM0 commentsViews: 70

माधव सावरगावे,औरंगाबाद

12 जुलै

औरंगाबाद जिल्हयात गोदावरी नदीपात्रामध्ये वाळुमाफियांनी धुमाकुळ घातला आहे. सरकारी नियम धाब्यावर बसवून वाळूचा भरमसाठ उपसा सुरु केल्यानं गोदावरी नदीचं पात्रचं धोक्यात आलंय. जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदारांनी सुरु केलेला हा धंदा आता सर्वाच्याच जीवावर बेतला आहे. वाळूचा उपसा किती होतोय याची पाहणी करायला गेलेल्या अधिकार्‍यांनी एक धक्कादायक बाब उघड केलीय. वाळूमाफियांनी अवैधपणे वाळू उपसा करुन जवळच्याच शेतामध्ये ही वाळू लपवून ठेवल्याचंही उघड झालंय. 39 हजार ब्रास वाळूच्या या साठ्याची किंमत बाजारात जवळपास 9 कोटी रुपये आहे.

गोदावरी नदीकाठावरील एका शेतामध्ये हे वाळूचे डोंगर पाहून जिल्हा प्रशासन आणि पोलिसाना धक्का बसलाय. पैठण तालुक्यातील पाटेगाव वाळुपट्टयाच्या ठेकेदारानी प्रशासनाच्या डोळयात धुळफेक करीत अवैधरित्या 39 हजार ब्रास वाळुचा साठा केलाय. ज्याची आज बाजारात किंमत ही 9 कोटीच्या वर जाते. वाळुमाफियाकडून वाढलेली दादागिरी याला लगाम लावण्यासाठी नवे पोलीस अधिकक्षक ईसु सिंधू यानी धडक कारवाईला सुरुवात केली. आणि कारवाईनंतर वाळुमाफियांचा खरा चेहरा समोर आला.

पैठण तालुक्यात 4 वाळूचे ठेके आहेत, यात पाटेगाव वाळुपटटयाला फक्त 28 हजार 628 ब्रास वाळुचा उपसा करण्याची परवानगी आहे. मात्र गेल्या 4 महिन्यापासून इंथे दररोज 100 हून अधिक ट्रक वाळू बाहेर पाठवली जाते आणि शिवाय अशाठिकाणी साठी करुन ठेवली जाते. दररोज 2 ते 3 हजार वाळू एका ठेकेदाराकडून उपसा केली जाते मात्र याकडे डोळेझाकपणा केला जातो.

या माफियामध्ये सर्वाधिक समावेश आहे तो परप्रांतियाचा. दररोज कोटयावधी रुपयाची वाळू चोरणारे हे चोरटे हे बाहेरच्या राज्यातून येऊन दहशत निर्माण करतायेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नाही. कोट्यावधीचा महसूल तर बुडतोय शिवाय माफियागिरी वाढल्यानं दहशत पसरली आहे.

close