उस्मानाबादेत छेडछाडीचा बळी

July 14, 2012 11:40 AM0 commentsViews: 4

14 जुलै

गुवाहटीची घटना ताजी असताना पुरोगामी महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात छेड काढल्यामुळे एका चौदा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. काल शुक्रवारी या मुलींने स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये ती 70 ते 80 टक्के भाजली होती. मात्र आज शनिवारी उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरोपी लखन आढाव या 22 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. उस्मानाबादमध्ये गडदेवदरी गावात राहणारी अल्पवयीन मुलगी आम्रपाली हजारे(वय 14) पाणी भरण्यासाठी घराबाहेर पडली होती. आम्रपाली रस्त्यातून जात असताना रोडरोमिओ आरोपी लखन आढाव (वय 22) याने तिला अडवून प्रेमपत्र चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला. तिने नकार देऊन सुध्दा बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावर संतापून आम्रपालीने त्याला झिडकारले. झालेल्या प्रकारमुळे आपली आणि आपल्या कुटुंबीयाची बदनामी होईल या भीतीने आम्रपालीने स्वत:ला जाळून घेतले. यामध्ये ती 70 ते 80 टक्के भाजली. आम्रपालीला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना आज शनिवारी या मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आम्रपालीचा जबाब नोंदवून घेतला होता.

रोडरोमिओ आरोपी लखन आढावला अटक करण्यात आली आहे. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा तरुणींच्या सुरक्षेतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गुवाहटीमध्ये भररस्त्यावर 20 नराधम तरुणांकडून एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. याप्रकरणामुळे संपूर्ण देशाच्या समाजव्यवस्थेला एकच हादरा बसला. पुरोगामीच्या महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यात असाच प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या प्रवकर्त्या नीलम गोर्‍हे यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सदरील घटनेतील आरोपीला जामीन मिळू नये अशी मागणी केली आहे. अशा प्रकरणात नेहमी आरोपींना जामीन मिळतो आणि आरोपी उज्जळ माथ्याने निर्लज्जपणे समाजात वावरतो. त्यामुळे अशा प्रकरणात जामीन मिळू नये अशी मागणी पावसाळी अधिवेशानात करणार असल्याचं नीलम गोर्‍हे यांनी सांगितलं आहे.

close