गोव्यातल्या ‘ इफ्फी ‘ त ‘ तांदळा – एक मुखवटा ‘

November 26, 2008 1:47 PM0 commentsViews: 15

26 नोव्हेंबर, गोवातुलसीदास चारी – गोव्यात सुरू असलेल्या 39 व्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमांचीही वर्णी लागली आहे. संजय सूरकर दिग्दर्शित ' तांदळा- एक मुखवटा ' या सिनेमाचंही स्क्रिनिंग झालं. अंधश्रध्देमुळे स्त्रीला कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं याचं चित्रण सिनेमात करण्यात आलं आहे. संजय सुरकर दिग्दर्शित सिनेमा 'तांदळा – एक मुखवटा' या सिनेमाचं गोव्यातील फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग झालं. यावेळी सिनेमातील कलाकारांनीही आवर्जून हजेरी लावली होती. सिनेमात आसावरी जोशी, तुषार दळवी, आनंद अभ्यंकर, उमेश कामत, उपेंद्र लिमये यांच्या भूमिका आहेत. तुषार दळवींनी सिनेमात निगेटीव्ह भूमिका केली आहे. आपल्या व्यक्तिरेखेविषयी तुषार दळवी सांगतात, "मी सिनेमात माजलेल्या जहागिरदाराची भूमिका केलेली आहे. त्याचा पंचक्रोषी दरारा असतो. लोकं त्याला वचकून असतात." या सिनेमात आसावरी जोशी मुख्य भूमिकेत दिसल्या आहेत. सिनेमातला त्यांचा मराठमोळा लुक बहुतेक प्रेक्षकांना आवडला आहे. सुरेश व्दादशीवारांच्या कादंबरीवर हा सिनेमा आधारित असून कादंबरीवरून सिनेमा बनवणं एक आव्हान असल्याचं दिग्दर्शक संजय सुरकर यांचं म्हणणं आहे. या सिनेमाला प्रेक्षकांनीही चांगलीच पसंती दर्शवली आहे. हा सिनेमा पाहता समाजातलं वास्तव सिनेमात दाखवण्याचा केला गेलेला प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरेल, अशी सुरकरांना आशा आहे.

close