मोटरमनचे आंदोलन मागे;रेल्वे रुळावर

July 20, 2012 2:12 PM0 commentsViews: 2

20 जुलै

मुंबईत आज दुपारी चार वाजण्याच्या सुमाराला पश्चिम रेल्वेचे मोटरमन अचानक सामुहिक रजेवर गेले. त्यामुळे रेल्वेसेवा तब्बल चार तास कोलमडली. संध्याकाळी साडेसात वाजता मोटरमननी संप मागे घेतला पण, रेल्वे ठप्प झाल्यानं प्रवाशांचे अतोनातच हाल झाले.मोटरमनच्या प्रलंबित मागण्यावर विचार करणार असल्याचं ठोस आश्वासन दिल्यानंतर मोटरमनने आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून 'लाईफलाईन' हळुहळु पुर्वपदावर येणार आहे.

नेमकं चाकरमान्याची कार्यालय सुटण्याची वेळ….रोजच्या प्रमाणे लोकलने घरी जाणार मुंबईकर…तीच लोकल, रोजच्या प्रवासातील सहकारी आणि ती जागा..पण आज प्रवासाच्या परतीच्या वाटेवर अचानक मोटरमनने सामुहिक रजेवर गेल्यामुळे चर्चगेट,दादर स्टेशनवरून एकही लोकल हलायला तयार नव्हती. जिकडे तिकडे गर्दीच गर्दी, घरी जाण्याची हुरहुर आणि त्या कोसळलेलं हे संकट त्यामुळे मुंबईकर जॅम वैतागले. स्टेशनच्या बाहेर पाऊलं टाकले तर बस स्टॉपला प्रचंड गर्दी, टॅक्सीवाल्यांच्या मनमानीपणामुळे अव्वाच्या सव्वा होत असलेली लूट पाहुन सर्वसामान्य प्रवाशी मात्र हवालदिल झाला.

या चार तासाच्या संपामुळे वेस्टर्न एक्स्प्रेसवरही वाहतूक विस्कळीत झाली. प्रवाशांच्या आतोनात हाल होत असताना बेस्ट बस धावून आली. चर्चगेट स्टेशनजवळून 115 जागा बेस्ट बसेस सोडण्यात आल्या. तर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी बसेस सोडण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आदेश दिले. दादर ते बोरीवली, बोरीवली ते ठाणे, वसई, नालासोपारा यासह अन्य गर्दीच्या मार्गावर बसेस सोडण्यात आल्या आहेत. अखेर रेल्वे प्रशासन आणि मोटरमन संघटनेत बैठक यशस्वी पार पडली. सर्व लोकल सुरु झाल्यामुळे मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला. या चार तासांच्या आंदोलनामुळे नेहमी प्रमाणे मुंबईकरांने मोठ्या संयमाने परिस्थितीचा सामना केला.

close