व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटन बंदी

July 24, 2012 10:24 AM0 commentsViews: 22

24 जुलैवाघांच्या संरक्षणासाठी देशपातळीवर अनेक उपाय सुरू आहेत. पण त्याला म्हणावं तसं यश येत नाही. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने आज एक महत्त्वाचा निकाल दिलाय. व्याघ्र प्रकल्पांमधल्या पर्यटनावर कोर्टाने बंदी आणली आहे. या निकालानंतर रणथंबोर आणि जिम कॉर्बेट या दोन राष्ट्रीय उद्यानांत लगेच पर्यटकांवर बंदी लागू झालीय. तर लवकरच मध्य प्रदेशातल्या कान्हा नॅशनल पार्कमध्येही बंदी लागू होईल.

मोठा आवाज करत धावणार्‍या जीप… वाघाच्या एका झलकसाठी पर्यटकांची चाललेली आरडाओरड… या सर्वांचा व्याघ्र प्रकल्पांवर मोठा भार होता. याचमुळे सुप्रीम कोर्टाने वाघांसाठी संरक्षित जंगलातल्या आतल्या भागात पर्यटनावर पूर्णपणे बंदी घातली आहे. व्याघ्र प्रकल्पातला बफर झोन ठरवण्यासाठी कोर्टाने राज्यांना तीन आठवड्यांचा वेळ दिलाय. कोर्टाचा हा निर्णय म्हणजे आपला विजय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण संस्थेनं दिलीय.

वन्यजीव प्रेमी वसीम कादरी म्हणतात, आम्ही यासाठी 2006 पासून लढतोय. कायद्यानुसार वाघांच्या कोअर भागात जायला बंदी आहे. पण वेगवेगळ्या राज्यांकडून या कायद्याचं उल्लंघन होत होतं.

पण सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाचा पर्यटन उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यताय. वाघांसाठी प्रसिद्ध असलेली जिम कॉर्बेट, रणथंबोर आणि कान्हा ही राष्ट्रीय उद्यानं पर्यटकांसाठी बंद करण्यात येतील. वन्यजीव पर्यटनाशी संबंधीत लॉबी या निर्णयावर नाराज आहे. पर्यटकांमुळे वन्यप्राण्यांच्या संरक्षणात मदतच होते, असं त्यांचं म्हणणंय. पण पर्यटनामुळे वाघांना कसलीच मदत झाली नसल्याचंही काहींचं म्हणणंय.

वन्यजीवप्रेमी सेजल व्होरा म्हणतात, चांगल्या पर्यटनाची उदाहरणं फारच कमी आहे. राष्ट्रीय उद्यानांमध्ये ज्या पद्धतीचं पर्यटन सध्या सुरूय ते अतिशय वाईट आहे.

कोर्टाच्या निर्णयामुळे आता सामान्य पर्यटकाला वाघ दिसणारच नाहीत का, हा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता आहे ती कोर्टाच्या अंतिम निर्णयाची.

close