आजपासून टोल भरु नका – राज

July 24, 2012 7:45 AM0 commentsViews: 33

24 जुलै

राज्यात टोलवसुलीच्या नावाखाली जनतेची लूट सुरू आहे. आजपर्यंत टोल किती वसुल केला गेला,त्याचा वापर कुठे झाला, यांचा खुलासा सरकारने द्यावा त्यामुळे जोपर्यंत सरकार टोलवसुलीत पारदर्शकता आणत नाही तोपर्यंत आजपासून जनतेनं टोल भरु नये असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय.

मनसेनं सलग 15 दिवस राज्यातील विविध टोलनाक्यांवर सर्व्हे करुन रोज किती टोलवसुली केली जाते याचा अभ्यास केला. या सर्व्हेतून कोणकोणत्या गोष्टी समोर आल्या आहेत त्याची माहिती आज राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिली. लोकांनी टोल भरु नये आणि टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी जर जबरदस्ती करण्यात आली तर प्रत्येक टोलनाक्यावर मनसे कार्यकर्ते पहारा द्यायला असतील असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मी टोल, टॅक्सविरोधात नाही पण सरकारने टोल नाक्याच्या आड जो काही जनतेकडून पैसा घेतला आहे तो कुठे खर्च झाला याची तपशील द्यावी. आम्हाला कोणताही संघर्ष करायचा नाही आणि करण्याची इच्छाही नाही वेळ आली तरी कमीही पडणार नाही असं आव्हानही राज यांनी दिलं.

दरम्यान राज ठाकरेंनी आदेश देताच मनसे कार्यकर्ते कामाला लागलेत. राज्यात काही ठिकाणी टोलनाक्यांवर कार्यकर्ते पोहोचले आहेत. ठाण्यातल्या आनंदनगर टोलनाक्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी टोल न भरताच गाड्या जाऊ दिल्या. तर बुलडाणा जिल्ह्यात मेहकर-वाशिम रोडवरील टोलनाक्यावरहीगाड्या टोल न भरताच जाऊ दिल्या जात आहेत. आता ठिकठिकाणी टोलनाक्यांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

close