अण्णांचे पुन्हा एकदा ‘जंतरमंतर’

July 24, 2012 1:54 PM0 commentsViews: 2

24 जुलै

टीम अण्णांचं उद्यापासून दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन सुरू होणार आहे. या आंदोलनात अण्णा हजारे 4 दिवसांनंतर म्हणजे 29 तारखेपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया उद्यापासून उपोषण करणार आहेत. उद्या सकाळी दहा वाजता टीम अण्णा राजघाटवर जाऊन गांधींजींच्या समाधीचं दर्शन घेणार आणि त्यानंतर जंतरमंतरवर उपोषण सुरू होणार आहे. लोकपाल विधेयकासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा असा पुनरुच्चार अण्णांनी केला.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर यूपीएविरोधात टीम अण्णांचा लढा पुन्हा सुरू झालाय. ठिकाण गेल्यावर्षीचंच..दिल्लीतलं जंतरमंतर…मागण्याही त्याच…आता एका नव्या मागणीची भर…ती म्हणजे टीम अण्णांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या 15 केंद्रीय मंत्र्यांची एसआयटीकडून चौकशी व्हावी. लोकपाल विधेयकासाठीच्या लढाईतलं पुढचं पाऊल आहे, असं लोकांना पटवून देण्याचा टीम अण्णांचा हा प्रयत्न आहे.

अरविंद केजरीवाल म्हणतात, जोपर्यंत मंत्र्यांच्या चौकशीसाठी समिती तयार होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिलं. ज्या मंत्र्यांवर आरोप केलेले आहेत, त्यांची नेमकी माहिती देणारी पत्रकं संपूर्ण देशभरात वितरीत केली जाणार आहेत. शिवाय, ऑडिओ व्हीज्युअल्स च्या माध्यमातून जंतर मंतरवरही टीम अण्णा आपलं म्हणणं मांडणार आहे.

गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये अण्णा उपोषण करणार याची घोषणा आधीच झाली होती.यावेळी मात्र अण्णांनी शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवला. त्यातही एक ट्विस्ट होतं. अण्णा बुधवारपासूनच उपोषण करणार असं सुरुवातीला सांगण्यात आलं. पण नंतर पत्रकार परिषदेत मात्र त्यांनी आपली भूमिका बदलली. टीम अण्णा विरुद्ध केंद्र सरकार या लढ्याचा नवा अध्याय पुन्हा एकदा सुरू होतोय. अण्णांनी आरोप केलेले मंत्री

1. डॉ. मनमोहन सिंग, पंतप्रधान2. प्रणव मुखर्जी, माजी अर्थमंत्री3. शरद पवार, कृषीमंत्री4. विलासराव देशमुख, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री5. पी. चिदंबरम, गृहमंत्री6. वीरभद्र सिंग, माजी पोलाद मंत्री7. सुशिलकुमार शिंदे, उर्जामंत्री8. कमलनाथ, नगरविकास मंत्री9. एस. एम. कृष्णा, परराष्ट्र मंत्री10. कपिल सिब्बल, मनुष्यबळ विकास मंत्री11. सलमान खुर्शिद, कायदामंत्री12. एम. अळगिरी, रसायन आणि खते मंत्री13. फारुख अब्दुल्ला, अपारंपारिक उर्जामंत्री14. जी. के. वासन – जहाजबांधणी मंत्री15. प्रफुल्ल पटेल, अवजड उद्योग मंत्री

close