पोलिसांच्या पतसंस्थेत 3 कोटींचा भूखंड घोटाळा

July 26, 2012 10:16 AM0 commentsViews: 15

26 जुलै

मुंबई पोलीस दलातील कर्मचार्‍यांसाठीच्या बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेत तीन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं माहिती अधिकारातून उघड झालंय. संस्थेच्या संचालकांनी संस्थेच्या कार्यालयासाठी केलेल्या जागाखरेदीत जवळपास तीन कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं उघडकीस आलंय.

सहकार निबंधकांनीच केलेल्या चौकशीत हा गैरप्रकार उघडकीस आला आहे. संस्थेला कार्यालयासाठी जागा खरेदी करायची होती. संस्थेनं दादर रेल्वे स्टेशनच्या लगत असलेली जागा खरेदी केली, पण गैरव्यवहार केली पण या खरेदीत जास्त जागा दाखवून खरेदी करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. संस्थेत गैरव्यवहार करणार्‍या संचालक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी संस्थेचं नायगाव इथं हे प्रशस्थ कार्यालय आहे. इंग्रजांच्या काळात ही पतसंस्था सुरु झाली असून संस्था 92 वर्ष जुनी आहे. मुंबई पोलीस दलातील 35 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या पतसंस्थेचे सदस्य आहेत. सदस्यांच्या पगारातून पतसंस्थेच्या शेअर्सचे तसेच लोन असल्यास लोनचे हप्ते कापले जात असतात. त्यामुळे या संस्थेच्या वसुलीचं प्रमाण 100 टक्के आहे. मात्र या संस्थेतच आता घोटाळा झालाय. तीन कोटी रुपयांचा हा घोटाळा जागा खरेदीत झालाय. दादासाहेब फाळके रोडवर ही जागा आहे. फ्रामरोज कोर्ट या इमारतीत ही जागा आहे. ही जागा मोटा कुटुंबीयांची होती. जागेचं क्षेत्रफळ तीन हजार 399 चौ.फुट कार्पेट आहे तर 4 हजार 78.80 चौफुट बिल्टअप आहे.

असं असतानाही पतसंस्थेनं केलेल्या खरेदीखतात पाच हजार चौ.फुट इतकी जागा असल्याचं नमुद करुन त्या क्षेत्रफळानुसार व्यवहार केला आहे. पतसंस्थेनं 29 हजार रुपये दरानं ही जागा खरेदी केली आहे. त्याची किंमत 14 कोटी 79 लाख रुपये आहे. या व्यवहाराची सहकार विभागातर्फे चौकशी करण्यात आली. या चौकशी अहवाल सादर करण्यात आला असून त्यात गैरव्यवहार असल्याचं म्हटलंय.

close