ठाण्यात काँग्रेस राष्ट्रवादीत समेट, सेनेची गोची

July 26, 2012 9:47 AM0 commentsViews: 99

विनय म्हात्रे, ठाणे

26 जुलै

शिवसेनेचे सत्तेचे ठाणे सध्या वादात अडकले आहे. एकीकडे धमकी प्रकरणावरुन महापौर अडचणीत आले असताना आता काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र येत स्थायी समितीचे सभापतीपद आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर अडचणीत सापडलेल्या शिवसेनेकडून स्थायी समिती अध्यक्षपद मागण्याचे संकेत भाजपने दिले आहे. त्यामुळे ठाण्यात सत्ताधारी शिवसेनाच अडचणीत आली आहे.

महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेनं राजकीय समीकरणं बदलत थेट काँग्रेसला स्थायी समितीचं सभापतीपद देत राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिला. पण याविरोधात कोर्टात राष्ट्रवादीच्या बाजूनं निर्णय आला आणि स्थायी समितीच बरखास्त करण्यात आली. यानंतर काँग्रेसची नाराजी दूर करत राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या काही अटी मान्य केल्या. यात स्थायी समिती सभापतीपद एक वर्षासाठी, दोन वर्षांसाठी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद, 2 वर्षांसाठी आघाडीचं नेतेपद, अडीच वर्षांसाठी शिक्षण मंडळाचं सभापतीपद, सत्ता आल्यास सव्वा वर्षासाठी महापौर आणि उपमहापौरपद काँग्रेसला दिलं जाणार आहे. तसंच सभागृहनेतेपदही सव्वावर्षासाठी असणार आहे.तिकडे अडचणीत आलेल्या शिवसेनेला दबावात आणण्याची संधी सापडल्याचं भाजपच्या स्थानिक नेत्यांना वाटतंय. भाजपच्या या नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत राष्ट्रवादीनं भाजपला ऑफर दिली खरी पण भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी ती ऑफर फेटाळली आहे.

एकूणच धमकी प्रकरणामुळे अडचणीत आलेले महापौर, काँग्रेसला आघाडीतून बाहेर पडण्यास कोर्टाने केलेली मनाई आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांची नाराजी यामुळे शिवसेनेला सत्तेचं ठाणं टिकवून ठेवण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे.

काँग्रेसला काय मिळणार ?

स्थायी समिती सभापतीपद – 1 वर्षविरोधी पक्षनेतेपद- 2 वर्षं आघाडीचं नेतेपद- 2 वर्षंशिक्षण मंडळ सभापती- अडीच वर्षंमहापौर,उपमहापौरपद- सव्वा वर्षसभागृह नेतेपद- सव्वा वर्ष

close