शालेय पोषण न देणार्‍या शाळांची होणार चौकशी

July 28, 2012 8:26 AM0 commentsViews: 67

28 जुलै

उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या शालेय पोषण आहाराचा बोजवारा आयबीएन लोकमतने उघडकीस आणल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला जाग आली आहे. आयबीएन लोकमतने दाखवलेल्या बातमीची दखल प्रशासनाने घेतली असून लोहारा तालुक्यातील 16 शाळांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे तसेच दोषी असणार्‍यांवर कारवाई करा असा आदेश शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षण अधिकार्‍यांनी दिले आहेत. कारवाईच्या भीतीने लोहारा तालुक्यातील शिक्षकांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

जिल्ह्यात शालेय पोषण आहाराचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 489 इतकी आहे. जिल्हा परिषद आणि इतर अनुदानित शाळेतल्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 742 मेट्रीक टन तांदूळ मंजूर झाला. तो पुणे विभागाकडून जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला. पण तो अजूनही शाळेत पोहचला नाही.

शाळेत विद्यार्थी संख्या वाढावी म्हणून सरकारने ही शालेय पोषण आहार योजना सुरु केली. काही विद्यार्थी घरुन डबा आणतात, तर काहीची परिस्थिती हलाखीची असल्यानं ते आहारावर अवलंबून असतात. अशात आता आहारच पोहचला नसल्याने विद्यार्थ्याचा पोटमारा होतोय. हा आहार सगळीकडे पोहचल्याचं सांगत, त्याबाबत तक्रार आली नसल्याचा दावा शिक्षण विभागाने केला.

close