टीम अण्णांच्या आंदोलनाकडे सरकारने फिरवली पाठ

July 30, 2012 5:25 PM0 commentsViews: 9

30 जुलै

टीम अण्णांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस. या आंदोलनाला हळूहळू लोकांचा प्रतिसाद वाढतोय. पण सहा दिवसांनंतरही केंद्र सरकारनं या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. टीम अण्णांसाठी ही चिंतेची बाब आहे.

जंतर-मंतरवर आंदोलन करणार्‍या टीम अण्णांच्या आंदोलनाच्या बाबतीत केंद सरकारने कडक भूमिका घेतली आहे. टीम अण्णांच्या मागण्यांना अंतच नाही, अशी कडक भाषा केंद्रानं वापरल्याची सूत्रांची माहिती आहे. लोकपालचा मुद्दा सिलेक्ट कमिटीकडे आहे. त्यामुळे त्यांच्याशी वाटाघाटी करणार नाही, असं केंद्राने स्पष्ट केलंय.

अण्णांच्या उपोषणाचे दोन आणि अरविंद केजरीवाल यांच्या उपोषणाचे 6 दिवस पूर्ण झालेत. जंतरमंतरवर त्यांना पाठिंबा द्यायला सोमवारीही मोठी गर्दी जमली. दरम्यान, योगगुरू बाबा रामदेव यांच्याशी टीम अण्णांचं सूत अजूनतरी पूर्णपणे जुळलं नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. गुजरातमध्ये जाऊन नरेंद्र मोदींची स्तुती केल्यामुळे बाबा रामदेव यांच्यावर अण्णांची दिल्लीतली टीम नाराज आहे. यावर अरविंद केजरीवाल म्हणतात, गुजरातमध्ये खूप भ्रष्टाचार आहे. तेव्हा असं करणं योग्य नाही.

तिकडे कृषी मंत्री शरद पवार यांच्या दिल्लीतल्या घरासमोर निदर्शनं झाली. तांदूळ आणि कणकेची पॉकेट्स फेकून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. यापूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या घराबाहेरही अशीच निदर्शनं झाली होती. पण पवारांच्या घरासमोरचे कार्यकर्ते आमचे नसल्याचं इंडिया अगेन्स्ट करप्शन संघटन या अरविंद केजरीवाल यांच्या संघटनेचं म्हणणं आहे.

अण्णांच्या आंदोलनाला येत्या दिवसांत लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो. यावर केंद्र सरकारची रणनीती ठरेल. म्हणूनच जास्तीत जास्त लोकांनी जंतरमंतरला यावं, यासाठी टीम अण्णा आवाहन करतेय.

close