मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांमध्येच बिनसलंय ?

July 28, 2012 3:33 PM0 commentsViews: 16

आशिष जाधव, मुंबई

28 जुलै

आमदारांच्या पत्राच्या घोळावरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात चांगलंच बिनसलंय. एवढंच नाही याप्रकरणावरून चव्हाणांनी दिल्ली दरबारी माणिकरावांची तक्रार केल्याचंही समजतंय.

शरद पवार यांच्या नाराजी नाट्यात आघाडीचं बिनसलेलं गाडं पुन्हा रूळावर आलं. पण या नाट्यादरम्यान काँग्रेस आमदारांच्या नाराजी पत्रावरून मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये वाद निर्माण झालाय. पवारांची नाराजी दिल्लीत होती पण खरं दुखणं मात्र राज्यातलं होतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांची खरी खदखद मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आहे हे ताडून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी ही आयती संधी लाटली.

काँग्रेस आणि सहयोगी पक्षाच्या 42 आमदारांचं मुख्यमंत्र्यांच्या विरोधातलं पत्र माणिकरावांनी प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांना पाठवलं. आणि तिथूनच नाराजी पत्राची बातमी फुटली आणि राज्यातल्या काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली पण मुख्यमंत्र्यांची बाजू घेत काँग्रेस हायकमांडनं माणिकरावांनाच सारवासारव करण्यास सांगितलं.

विदर्भ आणि मराठवाडयातल्या बहुतेक आमदारांच्या सह्या या नाराजीपत्रावर होत्या. हे पत्र लिहिण्यामागे माणिकरावांचीच फूस होती. हे मुख्यमंत्र्यांना पटल्यानंतर त्यांनी माणिकरावांना जाब विचारला ,तेव्हा कुठे माणिकरावांनी पत्राची प्रत मुख्यमंत्र्यांना दिली.

या नाराजीपत्राच्या घोळाचा वापर आता मुख्यमंत्री माणिकरावाच्या विरोधात करतायत. या पत्रावरून मुख्यमंत्र्यांनी माणिकरावांची तक्रार हायकमांडकडे केल्याचं समजतंय. एकूणच नाराजीनाट्य शरद पवारांनी दिल्लीत सुरू केलं पण त्याचा क्लायमॅक्स मात्र राज्यातल्या कॉग्रेसमध्ये पाहायला मिळणार अशीच चर्चा सध्या सुरू आहे.

close