कर्नाटक दुष्काळाच्या खाईत, शेतकरी हवालदिल

July 30, 2012 5:15 PM0 commentsViews: 5

दीपा बालकृष्णन, कर्नाटक

30 जुलै

यंदा देशभरात पावसाचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे शेतीसमोर संकट उभं राहिलंय. कर्नाटकला तर गेल्या 40 वर्षातल्या सर्वात मोठ्या दुष्काळाला सामोरं जावं लागतंय. तिथे सरासरीपेक्षा 70 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीतलं उत्पादनही कधी नव्हे इतकं कमी झालंय.

इतका कमी पाऊस गेल्या अनेक दशकात बघितलं नसल्याचं 68 वर्षांचे बाजीसाब सांगतात. बाजीसाब यांच्या शेतातली तूर पूर्ण वाळलीय. चिकबल्लापूर जिल्ह्यातल्या बागेपल्लीमध्ये असलेल्या त्यांच्या 6 एकर शेतातून आता काही पिक येईल, याची आशाच त्यांनी सोडली आहे. संपूर्ण कर्नाटकातच ही परिस्थिती आहे. दरवर्षी 72 लाख हेक्टरवर खरिपाची लागवड होते. यावर्षी मात्र फक्त 28 लाख हेक्टरवरच लागवड झाली आहे.

बाजीसाब म्हणतात, यावर्षीच काहीच उत्पन्न झालं नाही. 10 टक्के पेरण्याही झालेल्या नाही. आकाशाकडे डोळे लावून वाट बघत बसण्यापलिकडे आम्ही काहीच करू शकत नाही.

दरवर्षी आतापर्यंत कर्नाटकात डाळी, भूईमूग, ज्वारी यांची पिकं दिसायला लागतात. पण यंदा मात्र पावसाने चांगलीच दडी मारलीय. त्यामुळे ऐन शेतीच्या हंगामातही अनेक जण रोजगार हमी योजनेच्या कामावर जाताहेत. गुरांचा चाराही एक मोठी समस्या बनलीय. चारा नसल्यामुळे गेल्या आठवड्यात अनेक गायींचा भूकेनं मृत्यू झाला. हे काम करून आम्ही आपली कशीतरी गुजराण करतोय. शिवाय इथे कापलेलं गवत गुरांना देतोय अशी व्यथा शिवाप्पा मांडतोय. गेल्या दोन महिन्यात अनेक ठिकाणी ढगांनी दर्शन दिलं. त्यामुळे अनेकांनी दुबार पेरणीही केली. पण ढग बरसले नाही. चित्रावती धरण 128 गावांना पाणीपुरवठा करतं. पण त्यातलं पाणीही आता संपत आलंय. तालुका अध्यक्ष टी. लक्ष्मीनारायण रेड्डी म्हणतात, आता पाऊस पडला तरीही खूप उशीर झालाय. तूर, भूईमूग आता काही उगवणार नाही. येईल तर फक्त गवतच..

सरकारनं शेतकर्‍यांसाठी साडे तीन हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. फक्त 28 लाख हेक्टरवर लागवड झालीय. त्यापैकी 18 ते 20 लाख हेक्टरवरचं पीक वाया गेलंय. चाराही फक्त दहा आठवडे पुरेल इतकाच आहे. त्यामुळे आता आम्ही पंजाब सरकारकडे अधिकच्या चार्‍याची मागणी केलीय. केंद्राच्या टीमनंही तीन महिन्यात दोन वेळा दौरा केला. पण या सर्वांचा प्रत्यक्षात काहीच उपयोग झालेला नाही.

close