अजय संचेतींनी दिले ‘आदर्श’ फ्लॅटसाठी कर्ज

July 31, 2012 12:13 PM0 commentsViews: 4

31 जुलै

भाजपचे राज्यसभेतील खासदार आणि प्रसिद्ध ठेकेदार अजय संचेती यांच्या सॅन फायनान्स कार्पोरेशननं आदर्श सोसायटीच्या तब्बल दहा सदस्यांना फ्लॅटसाठी कर्ज दिल्याची बाब उघड झाली आहे. अलीकडेच अजय संचेती यांचे भागीदार अभय संचेती यांनी सॅन फायनान्सच्या वतीने चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यामध्ये ही बाब उघड झाली.

वैयक्तिक हितसंबंधांना अनुसरुन कर्ज देण्यात आले असा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्याता आला. या 10 पैकी एक कर्जदार परमवीर संचेती हा अभय संचेती यांचाच मुलगा आहे. तर दुसरे कर्जदार सदस्य अमरसिंह वाघमारे यांनीच केवळ फ्लॅटसाठी घेतलेलंकर्ज फेडल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. त्यामुळे 10 पैकी 8 सदस्यांनी कर्जाची रक्कम परत केली नाही तर फ्लॅट सॅन फायनान्सच्या नावे करण्याचे पत्र कंपनीनं सोसायटीला आधीच लिहिले आहे. तसेच कर्ज न फेडलं गेल्यास फ्लॅट परस्पर विकू नये असंही अभय संचेती यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

पण काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. दहापैकी 2 सदस्यांनीच पैसे परत केलेत, उर्वरित 8 सदस्यांनी पैसे कुठून आले आणि कसे परत करणार याविषयी समाधानकारक खुलासा केलेला नाही. कोणाच्या तरी नावावर फ्लॅट आहे पण त्यांची फ्लॅट घेण्याची आर्थिक कुवत सिद्ध होत नाही म्हणून ते बेनामी फ्लॅट्स सॅन फायनान्सनं तर घेतले नाहीत ना अशी शंका उपस्थि होतेय. विशेष म्हणजे खासदार अजय संचेती हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात.

त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात फ्लॅट खरेदीच्या माध्यमातून पैसा अजय संचेतींनी आदर्शमध्ये का गुंतवला असा सवाल आता विचारला जातोय. म्हणूनच याप्रकरणी चौकशी होऊन सत्य काय ते लवकर बाहेर यावं असं मत काँग्रेसनं व्यक्त केलंय.

close