मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा

August 1, 2012 3:10 PM0 commentsViews: 2

01 ऑगस्ट

राज्यात अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस होत असला तरीही मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात दुष्काळाची तिव्रता आता अधिक जाणवू लागली आहे. जुलै महिना संपत आलाय तरी मराठवाडयात 20 ते 25 टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झालीय. मराठवाड्यातल्या मोठया 8 धरणातला पाणीसाठा शून्यावर पोहचल्यानं पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणंही अशक्य झालंय.

आकाशात असे काळे ढग येतात अन् आले तसेच निघून जातात…ते कधीतरी बरसतील या वेड्या आशेवर मराठवाड्यातला शेतकरी आभाळाकडं डोळे लावून बसलाय. जुलै महिना संपतोय तरी मोठा पाऊस नाही. ही अवस्था आहे मराठवाडयातल्या सर्वच जिल्हयातली. सध्या मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात 25 टक्क्यापेक्षाही कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे फक्त 45 ते 50 टक्के पेरण्या झाल्यात तर लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्हयात पेरण्यापुरता पाऊस झाल्यानं इथं पेरण्या झाल्या पण पावसानं दडी दिल्यानं इथली पीकं संकटात सापडली आहे.

मराठवाड्यातीलं सर्वात मोठं असलेलं जायकवाडी धरण कोरडं पडण्याच्या मार्गावर आहे. हीच परिस्थिती येलदरी, माजलगाव, बिंदुसरा, ऊर्ध्व पैनगंगा, तेरणा, सीना कोळेगाव, विष्णुपुरी, मनार धरणाची आहे. त्यामुळे अनेक शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. म्हणूनच संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे.

मराठवाड्याप्रमाणेच अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनलीय. पावसाअभावी पारनेर तालुक्यातील 15 गावांतील पिकं जळून जाताहेत. विहिरी, कॅनॉल, तलाव सगळं काही कोरडं पडलंय. त्यामुळे ऐन पावसाळ्यात दुष्काळाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागतोय.

खरीप हंगाम गेला तर रब्बीवर शेतकर्‍यांची आशा असते. पण आता सरकारने रब्बीची पिकं लवकर घ्यावी, असं आवाहन केलंय. पण रब्बीसाठी तरी पाणी मिळेल, का असा गंभीर प्रश्न शेतकर्‍यांना पडलाय.

close