पुण्यात कमी तीव्रतेचे 4 स्फोट, एक जखमी

August 1, 2012 3:25 PM0 commentsViews: 8

01 ऑगस्ट

पुण्यात गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर आज संध्याकाळी साडे सातच्या सुमारास चार ठिकाणी कमी तीव्रतेचे स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. जंगली महाराज रस्त्यावर देना बँकच्या मागे, मॅकडोनाल्ड आणि बालगंधर्व मंदिरच्या गेटवर तिसरा स्फोट झाला. तर चौथा स्फोट हा गरवारे चौकात एका बुटाच्या दुकानाबाहेर झाला आहे. या स्फोटात एक जण जखमी झाला आहे. राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून दिल्ली,मुंबईहून एनआयचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

संध्याकाळी साडे सातच्या सुमारास एकापाठोपाठ चार कमी तीव्रतेच्या स्फोटाने पुणे हादरले. जंगलमहाराज रोडवर मॅकडोनाल्डच्या समोर एका कचर्‍याच्या डब्यात पहिला स्फोट झाला यानंतर देना बँकेच्या मागिल बाजूत एका सायकलच्या कॅरियरमध्ये स्फोट झाला. त्याचबरोबर बालगंधर्व मंदिरच्या गेटवर तिसरा स्फोट आणि चौथा स्फोट हा गरवारे चौकात एका बुटाच्या दुकानाबाहेर झाला आहे. या स्फोटात पेन्सिल सेल आणि डिटोनेटरचा वापर केल्याचं समोर आलं आहे. या स्फोटांची तीव्रता खूप कमी होती त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवतहानी झाली. सायकलच्या कॅरियरमध्ये स्फोट झाल्यामुळे कॅरियरला मोठे खड्डे पडले आहे. तर बालगंधर्व मंदिरासमोर झालेल्या स्फोटात खड्डा झाला. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे.

पण हे स्फोट कोणत्या कारणामुळे झाले याचा तपास पोलीस पथक करत आहे. घटनास्थळी पोलीसपथक, बॉम्बशोधक पथक दाखल झाले असून घटनेची चौकशी करत आहे. घटनास्थळी मुंबई आणि दिल्लीवरून एनआयएचे पथक पुण्याकडे रवाना झाले आहे. तसेच या स्फोटांचा दहशतवाद्याशी संबंध नाही असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलंय. राज्यभरात हाय अलर्ट जारी केला आहे.

आजच देशाच्या गृहमंत्रीपदी सुशीलकुमार शिंदे यांनी जबाबदारी स्विकारली आहे. ज्याभागात स्फोट झाला आहे. त्यापासून काही अंतरावर टिळक थियटर येथे लोकमान्य गंगाधर टिळक पुरस्काराच्या वितरण संमारभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी सुशीलकुमार शिंदे हजर राहणार होते. मात्र दिल्लीत व्यस्त असल्यामुळे ते येऊ शकले नाही. स्फोटाचा तपास एटीएस करीत असून राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

close