टीम अण्णांनी उपोषण सोडलं

August 3, 2012 6:08 PM0 commentsViews: 1

03 ऑगस्ट

राजकीय पक्षाचा एल्गार करत टीम अण्णांनी उपोषण सोडलं आहे. माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांच्या हातून अण्णांनी नारळ पाणी घेऊन उपोषण सोडलं. टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल,मनिष सिसोदिया,गोपाळ रॉय यांनीही नारळ पाणी घेऊन उपोषण सोडलं.

गेल्या दहा दिवसांपासून टीम अण्णांचे सदस्य दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर उपोषणाला बसले होते. उपोषणाच्या चौथ्या दिवशी अण्णांनी उपोषणला सुरुवात केली होती. तब्बल 10 दिवसांनंतर अखेर टीम अण्णांनी उपोषण सोडत राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. मात्र अण्णांनी स्वत: निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. मी बाहेर राहून पाठिंबा देईल. देशाला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे त्यासाठी आपण चांगला पर्याय देणार आहोत पण मी काही पक्ष पार्टी काढणार नाही. हे सगळं जनता ठरवेल यासाठी जनतेनं आम्हाला सुचना कराव्यात असं आवाहन अण्णांनी केलं.

तसेच आता सरकार पाडण्याची वेळ आही आहे. ही वेळ संपूर्ण क्रांतीची आहे. राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी सर्व देशात जनजागृती करणार आहोत. हा व्यवस्था परिवर्तनाचा लढा आहे. शेतकर्‍यांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू पण हे सगळे लोकांच्या मदतीनंच हे परिवर्तन घडवू, असं केजरीवाल यांनी सांगितलंय. टीम अण्णांनी आत्तापर्यंत सरकारशी लढा दिला पण आता हा लढा आणखी मोठा करून व्यवस्था परिवर्तनाची लढाई करावं असं आवाहन माजी लष्करप्रमुख जनरल वि. खे. सिंग यांनी केलं. अण्णांनी उपोषण सोडल्यानंतर राळेगणसिध्दीत एकच जल्लोष करण्यात आला.

close