टीम अण्णा बरखास्त

August 6, 2012 9:25 AM0 commentsViews: 3

06 ऑगस्टटीम अण्णाचं काम संपलंय, आता पुढची लढाई राजकीय आहे, असं स्पष्ट करत जनलोकपाल विधेयकासाठी एकत्र आलेल्या अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकार्यांची 'टीम अण्णा'आता बरखास्त करण्यात आली आहे. याबद्दल खुद्द अण्णा हजारे यांनी थोड्या वेळापूर्वी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून अण्णांनी ही घोषणा केली आहे. या ब्लॉगमध्ये अण्णांनी म्हटलं आहे, सरकारकडे जनलोकपालची मागणी करण्यासाठी सुरू केलेलं आंदोलन थांबलंय, पण संपलं नाही. आधी आम्ही सरकारकडे लोकपालची मागणी करत होतो. पण सरकार ती मागणी मान्य करत नसल्यामुळे आता संसदेत आम्ही चांगले लोक निवडून पाठवणार आहोत. त्यामुळे टीम अण्णाचं कार्य आम्ही समाप्त करत आहोत. जनलोकपालच्या कामासाठी ही टीम बनवण्यात आली होती. सरकारशी संबंध न ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. म्हणून टीम अण्णाचं कार्य समाप्त झालंय आणि टीम अण्णाची समितीही समाप्त झाली आहे.पण टीम अण्णा बरखास्त करण्याच्या अण्णांच्या निर्णयावर टीमच्याच दोन सदस्यांनी आक्षेप नोंदवला आहे. अण्णांचा ब्लॉगचा अर्थ काय, असा प्रश्न किरण बेदींनी ट्विटरवरून उपस्थित केलाय. तर माजी लोकायुक्त संतोष हेगडे यांनीही अण्णांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलंय. टीम बरखास्त करण्याच्या निर्णयाबाबत मीडियातून कळल्याचं त्यांनी म्हटलंय. अण्णांनी टीम बरखास्तच करायची होती तर मग त्यांनी टीमशी पुढच्या रणनीतीबाबत चर्चाच का केली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. किरण बेदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहलंय, अण्णांचा ब्लॉग वाचला. या सर्वांचा अर्थ काय? माहीत नाही. कारण आम्ही सर्वांनी अण्णांबरोबर एक प्रारंभिक बैठक घेतली होती. त्यात त्यांनी महत्त्वाचं मार्गदर्शन केलं होतं.

close