अड’वाणी’मुळे सोनिया गांधी संतप्त

August 8, 2012 9:42 AM0 commentsViews: 1

08 ऑगस्ट

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची आज वादळी सुरूवात झाली. आसाममधील हिंसाचाराच्या मुद्यावर आक्रमक होत भाजपनं आधी , प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर या मुद्यावरील चर्चेदरम्यान अडवाणींनी सरकारवर गंभीर आरोप केल्यानं आज संसदेत भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगला. विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी सरकारनं कोट्यवधी रुपयांचा वापर केल्याचा आरोप अडवाणींनी केला. तसेच यूपीए-2 सरकार बेकायदेशीर असल्याचं वक्तव्य अडवाणींनी आपल्या भाषणात केलं. अडवाणींच्या विधानामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी संतप्त झाल्या. त्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी अडवाणींच्या या आरोपावर जोरदार आक्षेप घेतला. लोकसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतर अडवाणींनी आपले आक्षेपार्ह शब्द मागे घेतले. दरम्यान, अडवाणी हे ज्येष्ठ नेते आहेत आणि आपण काय बोलत आहोत हे त्यांना चागलं कळत असल्याची प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे.

संसदेत गेल्या आठ वर्षात जे दृश्य कधीही दिसलं नाही ते आज पाहायला मिळालं. ते म्हणजे यूपीए अध्यक्ष सोनिया गांधींचा सभागृहात संतप्त झाल्या. यूपीए सरकारने पैसे देऊन विश्वासमत ठराव जिंकला, या अडवाणींच्या या वक्तव्यामुळे सोनिया गांधी संतापल्या. 2008 चा विश्वासदर्शक ठरावाबद्दल अडवाणी बोलत होते. आसामच्या हिंसाचारावर चर्चा सुरू असताना हा सर्व गदारोळ झाला. सोनिया गांधी संतापलेल्या पाहून काँग्रेसचे खासदार आक्रमक झाले. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. अखेर अडवाणींनी वादग्रस्त विधान मागे घेतलं.

सुशीलकुमार शिंदे यांचाही लोकसभा नेते म्हणून आणि गृहमंत्री म्हणून हा पहिलाच अनुभव होता. एकंदरीत दिल्ली सध्या पावसानं चिंब झाली असली, तरी संसदेतीलं वातावरण तापलंय आणि सोनिया गांधींच्या पवित्र्यावरून.. येणार्‍या दिवसात ते आणखी तापेल, अशी चिन्हं आहेत.

close