मावळ गोळीबाराला 1 वर्ष पूर्ण, शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच

August 9, 2012 10:55 AM0 commentsViews: 3

09 ऑगस्ट

मावळ गोळीबार प्रकरणाला आज 1 वर्ष होतं आहे. गेल्या वर्षी 9 ऑगस्टला मावळ तालुक्यातील बऊर गावाजवळ पवना धरणातून बंदिस्त पाईपलाईनच्या विरोधात रास्ता रोको करणार्‍या हजारो शेतकर्‍यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात तीन शेतकरी मृत्युमुखी पडले. तर अनेक जखमी झाले. यानंतर गेल्या वर्षभरात विरोधी पक्षनेते,आमदार,खासदारापासून, काँग्रेसचे युवराज राहुल गांधींपर्यंत अनेकांनी आंदोलकांवर आश्वसनांचा पाऊस पाडला. परंतु अजूनही या शेतकर्‍याच्या पदरी मात्र काहीच पडल नाही आहे.

मुंबई पुणे हायवेवर बऊरगावाजवळ पवना धरणातून बंदिस्त पाईपलाईन टाकण्यास विरोध करणार्‍या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला 9 ऑगस्टला हिंसक वळण लागलं होतं. मावळमध्ये झालेल्या आंदोलनात शेतकर्‍यांसोबतच पोलिसांनाही तोडफोड केली होती. त्याप्रकरणी सहा पोलीस कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

बऊरजवळ आंदोलनाच्या ठिकाणी उभ्या असलेल्या गाड्या पोलिसांनीच फोडल्या होत्या. शिवाय लोकांवर गोळीबारही केला होता. त्यात तिघांचा जीव गेला होता. पोलिसांनी कसा लाठीचार्ज केला आणि तोडफोड कशी केली याची दृश्यं आयबीएन-लोकमतने सर्वात पहिल्यांदा दाखवली होती. त्यानंतर या पोलिसांवर कारवाई झाली.

तोडफोडीप्रककरणी पाच लोकांनाही अटक करण्यात आली. मारूती गरदाळे, रवी गरदाळे, शेखर दळवी, नितिन दळवी आणि किरण वाघमारे अशी त्यांची नावं आहेत. तर जवळपास 1200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

close