विलासरावांना अखेरचा निरोप

August 15, 2012 11:52 AM0 commentsViews: 15

15 ऑगस्ट

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर त्यांच्या जन्मभूमी बाभळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला. गावाजवळील वडिलोपार्जित शेतात अंत्यसंस्कार झाला. त्यांच्यावर अंत्यविधीपुर्वी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या 17 फैरी झाडून मानवंदना दिली. जेष्ठ चिरंजीव अमित यांनी विलासरावांना अग्नी दिली यासमयी रितेश,धीरज सोबत होते तेव्हा तेथे उपस्थित त्यांच्या पत्नी वैशाली, सून जेनेलिया,बंधू दिलीप यांच्यासह संपूर्ण जनसमुदायाला भावना अनावर झाल्या.आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी लाखो लोकांनी गर्दी केली होती. आपला लाडक्या नेत्याला निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले. साश्रु नयनानी त्यांना निरोप देण्यात आला.

पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह मुंख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, आमदार,खासदार यांच्या सर्वपक्षीय नेत्यांनी विलासरावांना अखेरचा निरोप दिला. विलासरावांनी चटका लावणारी एक्झीट घेतल्यामुळे अजूनही ते आपल्यात नाही यावर विश्वास बसणं शक्य नाही. काल मंगळावारी दुपारी 1:30 वाजता चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. गेल्या वर्षपासून ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते. पण 15 दिवसांपुर्वी आजार बळावला. तातडीने मुंबईतील ब्रीच कँण्डी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले पण तेथे ही प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे चेन्नईला हलवण्यात आले. गेली आठवडाभर त्यांनी मुत्यूशी लढा दिला पण काळाला काही वेगळंच मान्य होतं. अन् काल मंगळवारी त्यांनी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी त्यांचे पार्थिव जन्मगावी बाभळगाव येथे आणला. ज्या गावापासून राजकारणाला सुरुवात केली..त्यांना सरपंच,मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रीपदी पाहणारे त्यांचे लाखो लातूरकर आज अश्रूना आवर घालू शकले नाही. आमचा नेता गेली…लातूर पोरकं झालं अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. अनेक मान्यवरांनी विलासरावांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांची कारकिर्द खूप मोठी होती…सुशीलकुमार आणि विलासराव यांच्या जोडीला 'दो हंसो का जोडा' असं म्हटलं जायाचं. त्यामुळे आज एका 'राजहंसा'ने आपला निरोप घेतला अशी भावना व्यक्त होतं आहे.

close