नरिमन हाउसची कारवाई पूर्ण

November 28, 2008 5:10 PM0 commentsViews: 10

28 नोव्हेंबर, मुंबई10.20 PMनरिमन हाउसमधली कारवाई अखेरीस पूर्ण झाली आहे. एनएसजीच्या जवानांनी संपूर्ण बिल्डींग ताब्यात घेतली आहे. 48 तासांनंतर अखेर एनएसजीच्या बहादूर जवानांनी ही कारवाई यशस्वी करून दाखवली आहे. या कारवाईत एनएसजीच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं, तर एनएसजीच्या गजराज सिंग या जवानाला वीरमरण आलं. एनएसजीचे अन्य दोन जवान या कारवाईत जखमी झाले आहेत. या कारवाईदरम्यान अतिरेक्यांनी 5 ओलिसांची हत्या केली आहे. दरम्यान एकाही निष्पाप नागरिकाची हत्या होऊ नये याची एनएसजीनं पुरेपूर काळजी घेतली, म्हणून कारवाईचा वेग थंडावल्याचं एनएसजीनं सांगितलं. दरम्यान एनएसजीला या बिल्डींगमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त मिळाली आहेत. यात जिवंत हँडग्रेनेड्सचाही समावेश आहे. कामगिरी फत्ते करून बाहेर येणार्‍या एनएसजींच्या जवानांचं बाहेर जमलेल्या नागरिकांनी उस्फूर्त स्वागत केलं. नागरिकांच्या प्रेमानं आमचे जवान भारावून गेल्याची प्रतिक्रिया एनएसजीच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.28 नोव्हेंबर, मुंबई9.00 PM नरिमन हाउसमधला संघर्ष काही काळ थंडावला आहे. काही वेळापूर्वी या बिल्डींगमधून तीन स्फोट झाल्याचे आवाज आले होते. यानंतर कुलाब्याकडे जाणार्‍या एनएसजीच्या गाड्या माघारी आल्या होत्या. मात्र आता एनएसजीच्या जवानांनी अतिरेक्यांचा शोध घेताना खबरदारी म्हणून किंवा बंद झालेले दरवाजे उघडण्याकरता हे स्फोट केल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक जमले असून ते देशभक्तीच्या घोषणा देत आहेत. 28 नोव्हेंबर, मुंबई8.15 PMनरिमन हाउसमधला संघर्ष जवळपास संपल्याची माहिती हाती आली होती. मात्र अजूनही नरिमन हाउसमध्ये तिसर्‍या मजल्यावर अतिरेकी असल्याची माहिती नव्यानं समोर आली आहे. काही वेळापूर्वीच अतिरेक्यांनी तीन राउंड्स फायर केले आणि तीन हँडग्रेनेडही फेकले. यामुळे ही कारवाई अजून काही काळ चालू रहाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.साधारण साडे सहाच्या सुमारास एनएसजीचे जवान या बिल्डिंगमधून बाहेर पडले. त्यांच्या पाचही गाड्या कुलाब्याकडे रवाना झाल्या. यानंतर तेथे जमलेल्या नागरिकांनी जल्लोष केला. त्यामुळे ही कारवाई संपुष्टात आल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र काही वेळातच पुन्हा गोळीबार झाल्याने माघारी गेलेल्या एनएसजीच्या गाड्या नरिमन हाउसकडे परत वळवण्यात आल्या. सध्या तेथे अतिरेकी आणि एनएसजीच्या जवानांमध्ये मोठी धुमश्चक्री सुरू आहे. इथे तब्बल 45 तासांपेक्षा जास्त काळ ही धुमश्चक्री सुरू आहे. अतिरेक्यांनी केलेल्या ग्रेनेडच्या स्फोटात नरीमन हाऊसचा चौथ्या जमल्याचा एक भाग कोसळलाय. कमांडो सकाळी नरीमन हाऊसच्या टेरेसवर हेलिकॉप्टरमनधून उतरले. आणि त्यांनी आत घुसून कारवाई ही केली. ही थरारक कारवाई पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केलीय. त्यामुळे एनएसजी आणि पोलिसांच्या कारवाईत अडचणी येत होत्या. पण आता हे ऑपरेशन संपत आलंय. न एनएसजीचे कमांडोज नरिमन हाऊसच्या समोरच्या इमारतीच्या गच्चीवर काल रात्रीपासून तळ ठोकून आहेत. दुर्देवाने एक कमांडो यात जखमी झालाय. एकूण साठ ते सत्तर एनएसजीचे जवान या मोहिमेवर आहेत. पण अजून अतिरेक्यांकडे नेमका किती शस्त्रसाठा किती आहे याचा अंदाज आलेला नाहीये, मात्र मोबाईलमधल्या जीपीआरएस आणि ऑटोकॅडसारख्या अत्याधुनिक सुविधांमुळे अतिरेक्यांना नरिमन हाऊसमधल्या खोल्यांचा ताबा मिळवता आला हे स्पष्ट झालंय. 28 नोव्हेंबर, मुंबई8.00 PMनरिमन हाउसमधला संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहचला आहे. एनएसजीनं ही कारवाई संपल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र नरिमन हाउसमधून बाहेर पडलेल्या जवानांकडून तसे संकेत मिळाले आहेत. या कारवाईत पाच ओलिसांचा मृत्यू झाला असून एक कमांडो जखमी झाल्याची माहिती एनएसजीनं दिली आहे. या कारवाईत दोन अतिरेक्यांचा खातमा केल्याचा दावा एनएसजीनं केला आहे. एनएसजीच्या जवानांनी गेल्या काही तासात अतिरेक्यांवर जोरदार हृल्ला केला होता. जवळपास सर्व अतिरेक्यांना त्यांनी ठार केलं होतं. केवळ एक अतिरेकी नरिमन हाउसमध्ये शिल्लक असल्याची बातमी मिळाली होती. त्यालाही पोलिसांनी तिसर्‍या मजल्यापर्यंत ढकललं होतं आणि तिसर्‍या मजल्यावर संघर्ष चालू आहे.

close