आर.आर.पाटील, राजीनामा द्या – राज

August 17, 2012 3:39 PM0 commentsViews: 4

17 ऑगस्ट

शनिवारी सीएसटी परिसरात डोळ्यादेखत हिंसाचार घडत असताना पोलीस दल शांतपणे पाहतं होतं. इतर आंदोलनाच्या वेळी गोळीबार,लाठीचार्जचे आदेश दिले जातात मग त्या दिवशी गप्प का बसले ? असा संतप्त सवाल करत गृहमंत्री आर.आर.पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावा आणि अजित पवार यांनी गृहखाते आपल्या हातात घ्यावे अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मंगळवारी गिरगावमधून राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे असं आवाहन राज यांनी केलं.

मुंबईत सीएसटी परिसरात झालेल्या हिंसाचारावर राज ठाकरे पुन्हा एकदा गृहखात्यांवर बरसले. आपल्या निवासस्थानी कृष्णकुंज येथे आज पत्रकार परिषद घेतली. आम्ही जेव्हा टोल नाक्याविरोधात,मराठी पाट्यांसाठी आंदोलन केली तर माझ्या कार्यकर्त्यांवर दरोडेखोरांचे खटले दाखल करण्यात आले. मावळ येथे शेतकर्‍यांवर गोळीबार केला. मग सीएसटी येथे हिंसाचार घडत होता तेव्हा हे पोलीस का गप्प बसले ? रमजान ईदनंतर त्यांच्याविरोधात कारवाई करु याला काय अर्थ ? घटना घडली तातडीने कारवाई झाली पाहिजे होती. यातून उलट पोलिसांचे खच्चीकरण होत आहे. पोलिसांनाच शिव्या घातल्या जात आहे. पोलिससुध्दा आपलीच माणसंच आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा आणि स्वत:ला टग्या समजणार्‍या अजित पवारांनी गृहखाते आपल्या हातात घेऊन टगेखोरी बंद करावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. येत्या मंगळवारी मनसेच्या वतीने गिरगावमधून आबांच्याविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चा सर्वपक्षीयांने यावे हा मोर्चा आपल्यावर झालेल्या हल्लाविरोधात आहे त्यामुळे सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज यांनी केलं.

close