प्रफुल्ल पटेल यांच्या निर्णयामुळे 27 हजार कोटींचे नुकसान

August 20, 2012 5:01 PM0 commentsViews: 22

20 ऑगस्ट

कॅगच्या दिल्ली विमानतळाबद्दलच्या अहवालामुळे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल आता चांगलेच अडचणीत सापडले आहे. प्रफुल्ल पटेल हवाई वाहतूक मंत्री असताना त्यांनी डायल या खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे सरकारचा 27 हजार 415 कोटींचा महसूल बुडाला असं कॅगचं म्हणणं आहे. पटेल यांच्या या निर्णयांमुळे हजारो कोटींची जागा कवडी मोल दराने डायल कंपनीला दिली गेली आणि त्याचवेळी प्रवाशांना मात्र साडे तीन हजार कोटींचा भुर्दंड बसलाय. देशाच्या विमानतळ बांधणीच्या इतिहासातला हा सर्वात मोठा घोटाळा आहे.

कॅगच्या अहवालानुसार दोन टप्प्यांत हा घोटाळा झालाय. कसा झाला हा घोटाळा ?

दिल्ली विमानतळाच्या आधुनिकीकरणाचं काम खाजगी कंत्राटदाराला देण्याचा निर्णय वाजपेयी सरकारच्या काळात घेण्यात आला. युपीए 1 च्या काळात एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (DIAL)ला विमानतळ विकासाचं कंत्राट दिलं. एअरपोर्ट अथॉरिटीने विमानतळाची 4608 एकर जमीन डायल कंपनीला 60 वर्षांसाठी भाड्याने दिली. काही काळाने विमानतळाजवळी 190 एकर अतिरिक्त जमीनही DIAL ला देण्यात आली. 100 रुपये प्रती वर्ष एवढं अत्यल्प भाडं आकारण्यात आलं. पण मेरील लिंच या जागतिक दर्जाच्या इस्टेट एजंट कंपनीनुसार या जागेची किंमत 100 कोटी रुपये प्रति एकर सांगितली आहे. यानुसार कॅगनं या जागेची किमान किंमत 24 हजार कोटी रुपए इतकी असल्याचं सांगितलंय. पण एअरपोर्ट अथॉरिटीनं ही जागा 100 रु.प्रतिवर्ष आणि 31 लाख रुपए एकरकमी इतक्या नगण्य किंमतीत 60 वर्षांसाठी वापरायला दिलाय.

घोटाळ्याचा दुसरा टप्पा

2006 मध्ये डायलला विमानतळ विकासाचं कंत्राट देण्यात आलं तेव्हा ऑपरेशन मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करार करण्यात आला. करारानुसार विमानतळ विकासासाठी लागणारा निधी हा डायलनं उभा करायचा होता. विमानतळाच्या बाजूची 190 एकर जमीन व्यापारी पद्धतीनं वापरून हा निधी उभा करायचा होता. पण हवाई वाहतूक मंत्र्यांनी 2009 साली डायलला विशेष अधिकार दिला. या विशेष अधिकारानुसार विमानतळ विकास शुल्क प्रवाशांना देण्यात येणार्‍या सुविधांमधून उभारण्याची परवानगी डायलला देण्यात आली. हवाई वाहतूक मंत्र्यांनी कॅबिनेटलासुद्धा या निर्णयाची माहिती दिली नाही. या विकास शुल्काच्या माध्यमातून डायलनं 3415 कोटी 35 लाख रूपये कमावले.

विमानतळ बांधणीच्या इतिहासातला देशातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. सरकारची तब्बल 24 हजार कोटी रुपयांची जागा अत्यंत कवडी मोल भावाने देण्यात आली आणि डायलनं प्रवाशांना लुटून त्यातून 3415 कोटी रुपये कमावले. म्हणजे एकूण 27 हजार 415 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे, असं कॅगनं म्हटलंय.

close