गोपीनाथ मुंडेंचं पुन्हा तळ्यात-मळ्यात ?

August 20, 2012 5:21 PM0 commentsViews: 33

आशिष जाधव , मुंबई

20 ऑगस्ट

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर मराठवाड्यातली पोकळी भरुन काढण्यासाठी भाजप नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाऊ शकतात, अशी चर्चा सुरु झाली आहे. पण गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेस प्रवेश वाटतो तितका सोपा नाही, मुंडेंच्या प्रवेशावरुन काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजू शकते.

मराठवाड्यात प्रभाव असलेल्या विलासराव देशमुख यांचं अकाली निधन झालं.अशोक चव्हाण तर आधीच आदर्शच्या फेर्‍यात अडकले आहेत. यामुळे साहजिकच मराठवाड्यात काँग्रेसची मोठी अडचण झाल्याचं चित्र निर्माण झालंय. म्हणूनच आता भाजपमध्ये नाराज असलेल्या गोपीनाथ मुंडेंना पक्षात घेण्यावाचून काँग्रेसला पर्याय नसल्याची चर्चा सुरु झालीय. पण यासर्व अफवा असल्याचा खुलासा प्रदेश काँग्रेसने केलाय.

खरंतर मधल्या काळात गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला असलेला बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याच पुतण्याच्या साथीनं पोखरुन काढला. त्यामुळे मुंडेंनाच स्वत:चं अस्तित्व कायम राखण्यासाठी काँग्रेसचं बळ हवंय. हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना माहित आहे. म्हणूनच की काय भाजपमधल्या गडकरी गटाकडून गोपीनाथ मुंडेंची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न होतोय.

विनोद तावडे म्हणतात, 2014 मध्ये सेना भाजप रिपाईच्या मुख्यमंत्री बनण्याची संधी आहे त्यामुळे ते कशाला काँग्रेसमध्ये जातील.

एकीकडे राष्ट्रवादीचे मराठा मतांचे राजकारण, तर दुसरीकडे काँग्रेसमधली मराठा लॉबी गोपीनाथ मुंडेंच्याविरोधात.अशावेळी गोपीनाथ मुंडेंशी प्रत्यक्ष बोलणी करण्यापूर्वी काँग्रेस हायकमांडला बरीच चाचपणी करावी लागेल हे स्पष्ट दिसतंय.

close