मनसेचा विराट मोर्चा आझाद मैदानावर धडकला

August 21, 2012 9:49 AM0 commentsViews: 38

21 ऑगस्ट

'परवानगी नाही दिली तरी मोर्चा काढणारच' असं आव्हान देणार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला शब्द पाळत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान विराट मोर्चा काढून दाखवला आहे. कार्यकर्त्यांची तुफान गर्दी,हातात मनसेचे झेंडे आणि राज ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है'अशा घोषणा देत मोर्चा आझाद मैदानावर धडकला. हा मोर्चा अत्यंत शांततेत पार पडला आणि तो यशस्वीही झाला. राज्यभरातून हजारो मनसैनिक या मोर्चात सहभागी झाले होते.

सकाळपासूनच राज्यातील विविध भागातून कार्यकर्ते गिरगाव चौपाटीवर दाखल झाले. दुपारी दोनच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिद्धीविनायकाचं दर्शन घेऊन सहकुटुंब मोर्चात सहभागी झाले. अर्ध्या तासाचा पायी प्रवास करुन हा मोर्चा तीनच्या सुमारास आझाद मैदानात पोहोचला. यानंतर आझाद मैदानात केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्यांना स्पर्श करत सरकारवर घणाघाती टीका केली. गृहमंत्री आर आर पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांना थोडीशी जरी लाज उरली असेल, तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी पुन्हा एकदा त्यांनी मागणी केली. हिंसाचाराची पूर्वकल्पना असतानासुद्धा पोलीस गप्प का राहिले याकडं पुन्हा एकदा त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं.

मुंबईतल्या हिंसाचारातले लोक हे महाराष्ट्रातले नव्हते, तर ते महाराष्ट्राबाहेरचे होते, असा आरोप करत राज ठाकरेंनी बांग्लादेशचा एक पासपोर्ट दाखवून हल्लेखोर बांग्लादेशचे असल्याचा दावा केला. काहीही झालं तरीही पोलिसांना हात लावायचा नाही, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. पोलिसांवर हात टाकणारा तो कुठल्याही धर्माचा असला तरी त्याला फोडून काढा, असं आवाहनही त्यांनी केलं. माझा धर्म हा महाराष्ट्र धर्म आहे, असं म्हणत अखेर त्यांनी त्यांच्यावर होत असलेली हिंदुत्त्वाचा मुद्दा खोडून काढला.

close