राज,बांग्लादेशी शोधून दाखवा 2 कोटी रुपये देईन-आझमी

August 22, 2012 10:37 AM0 commentsViews: 4

22 ऑगस्ट

माझ्या मतदारसंघात राज ठाकरे यांनी 1 लाख बांग्लादेशी शोधून दाखवावे, यासाठी त्यांना दोन महिन्याचा अवधी देतो जर त्यांनी शोधून दाखवले तर मी त्यांना 2 कोटी रुपयांचा चेक देईन आणि जर त्यांनी शोधून दाखवले नाही तर त्यांनी राजकारणातून माघार घ्यावी असं थेट आव्हान समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी दिले. तसेच खोट्या पुराव्यावर राजकारण करुन फक्त टाळ्या मिळवता येतात असा टोलाही लगावला.

काल मंगळवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीएसटी हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान विराट मोर्चा काढला. आझाद मैदानात मोर्चा पोहचल्यानंतर त्यांचे रुपांतर विराट सभेत झालं. यावेळी राज यांनी हिंदुत्वाचा मुद्दा खोडून काढत माझा फक्त एकच धर्म आहे तो फक्त महाराष्ट्र धर्म आहे असं ठणकावून सांगितलं. तसेच या हिंसाचारामागे बांग्लादेशी,परप्रांतीय आहे असा आरोप करत राज यांनी बांग्लादेशचा पासपोर्ट भर सभेत दाखवत अबू आझमींवर हल्लाबोल केला. अबू आझमी यांनी हिंसाचाराच्या दिवशी याच मैदानात भडकावू भाषण केले. यात ज्या दोघांचा मृत्यू झाला होता त्यांना अबू आझमींनी दीड लाखांचा चेक दिला असा आरोप राज यांनी केला होता. राज यांच्या आरोपाचे खंडन करत अबू आझमींनी राज यांना थेट आव्हान दिलं. खोटे आरोप करुन लोकांकडून फुकटात वाहवाह, टाळ्या मिळवता येतात. पण खोट्या पुराव्यावर राजकारण करुन लोकांना फसवू नये. जर आरोप करतच आहात तर माझ्या भिंवडी मतदारसंघात 1 लाख बांग्लादेशी राज यांनी शोधून दाखवावे यासाठी 2 महिन्याचा अवधी घ्या जर त्यांनी शोधून दाखवले तर मी त्यांच्यासाठी 2 कोटींचा चेक तयार करुन ठेवला आहे. त्यांना देईन जर नाही झाले तर राजकारणातून बाहेर पडावे असं थेट आव्हान अबू आझमींनी दिले. तसेच 11 ऑगस्टची दंगल ड्रग माफियांनी घडवली होती, असा दावाही आझमी यांनी केला.

close