डेक्कन मुजाहदीन – नवं नाव जुना चेहरा

November 28, 2008 5:04 PM0 commentsViews: 6

28 नोव्हेंबर, मुंबईबुधवारची रात्र मुबईकरांसाठी काळरात्र ठरली. मुंबईत ठिकठिकाणी गोळीबार आणि स्फोट घडवून दहशतवाद्यांनी भारताच्या या आथिर्क राजधानीला जबरदस्त हादरा दिला. मात्र यावेळी घातपातासाठी दहशतवाद्यांनी जी पद्धत वापरलीय ती अगदी वेगळी आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचा मनसुबा आहे तरी काय. असा प्रश्न पडलाय. या घातपाताची जबाबदारी डेक्कन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेनं उचललीय. या निमित्तानं एका नव्याच दहशतवादी संघटनेचं नाव समोर आलं आहे. देशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा घातपात असा या घटनेचा उल्लेख केला जातोय.आणि यावेळी अगदी वेगळ्या पध्दतीनं दहशतवाद्यांनी आपली कारवाई फत्ते केलीय.या घातपाताची जबाबदारी डेक्कन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेनं घेतलीय. या नव्या दहशतवादी संघटनेच्या सहभागामुळे पोलिसंच नाही तर गुप्तचर संस्थाही गोंधळून गेल्यात. कारण आजवर देशात झालेल्या घातपाती कारवायांमध्ये पहिल्यांदाच या संघटनेचं नाव समोर आलंय. याआधी लष्कर ए तोयबा , अल कायदा , जमाते इस्लामी , हिजबूल मुजाहिद्दीन अशा विविध दहशतवादी गटांचा सहभाग असल्याचं उघड झालं होतं.मात्र आता पहिल्यांदाच डेक्कन मुजाहिद्दीनचं नाव उजेडात आलंय. खरं तर लष्कर ए तोयबा , अल कायदासारख्या दहशतवादी संघटना या एकाच गटासाठी काम करतात मात्र नवी कारवाई करताना या संघटना नवनवीन नावं ठेवतात. पोलिसांना तपासात अडथळा येण्यासाठी दहशतवाद्यांची ही ठरलेली पध्दत आहे. आता डेक्कन मुजाहिद्दीन ही संघटनाही लष्कर ए तोयबाचा एक भाग आहे.पाकिस्तानातील लाहोर , कराची आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये या संघटनेच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचं बोललं जातंय. डेक्कनमध्ये नव्या दमाच्या तरूण जिहादींचा भरणा करण्यात आला आहे. इंडियन मुजाहिद्दीनने सप्टेंबर 2008 मध्ये मुंबईत घातपात घडवण्याची धमकी दिली होती. आताची घटना ही त्याचाच एक भाग असल्याचं नाकारता येत नाही. ज्या पध्दतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर घातपाताची योजना आखून तो घडवून आणला त्यामागे लष्कर ए तोयबा , इंडियन मुजाहिद्दीन याच संघटनेचा हात असल्याचा पोलिसांचा दाट संशय असून डेक्कन मुजाहिद्दीन हे नवं नाव असलं तरी त्यामागे इंडियन मुजाहिद्दीनंच असल्याचं बोललं जातंय.

close