संसदेच्या कामकाजाचा पुन्हा ‘कोळसा’,उद्यापर्यंत तहकूब

August 22, 2012 1:31 PM0 commentsViews: 4

22 ऑगस्ट

कोळसा खाण वाटप घोटाळ्यावरून आज सलग दुसर्‍या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात काम होऊ शकलं नाही. पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजप खासदारांनी सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ घातला. भाजपचा मित्रपक्ष संयुक्त जनता दलाने मात्र याविषयावर चर्चेला तयार असल्याचे म्हटलंय. यूपीएच्या घटकपक्षांनीही पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी स्पष्ट शब्दात फेटाळलीय. तर भाजपनंही टू जी घोटाळ्यावरच्या लोकलोखा समितीतून बाहेर पडत सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

कोळसा खाण वाटपात गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगने ठेवल्यावर भाजप आक्रमक झाली. संसदेचं कामकाज ठप्प करून भाजपने पंतप्रधानांचा राजीनामा मागितला. या मागणीला ममतांचाही पाठिंबा मिळावा, यासाठी मध्यरात्री एक गुप्त बैठक झाली. पण तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना हा प्रस्ताव रुचला नाही आणि त्यांनी सकाळपर्यंत स्पष्ट केलं की आम्ही यूपीएसोबतच राहू. बुधवारी सकाळी संसदेचं कामकाज सुरू झालं, तेव्हा भाजपनं पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.

एकीकडे तृणमूलने भाजपचा भ्रमनिरास केला तर दुसरीकडे मित्रपक्षांनीच भाजपविरोधी सूर आळवले. पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, या भाजपच्या मागणीला जेडीयूने पाठिंबा न दिल्यानं एनडीएतले मतभेद उघड झाले. तिकडे पंतप्रधानांच्या बचावासाठी सरकारचे सगळेच मंत्री मैदानात उतरले. पण भाजपही मागे हटायला तयार नाही. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव बनवायला सुरुवात केलीय. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधान आणि चिदंबरम यांनी लोकलेखा समितीसमोर हजर व्हावं, अशी मागणी करत समितीच्या बैठकीतून भाजपचे 5 सदस्य बाहेर पडले.

पंतप्रधानांच्या राजीनाम्याव्यतिरिक्त इतर कुठलाही पर्याय मान्य नसल्याचं भाजपचं म्हणणंय. पण यूपीएचे घटकपक्ष पंतप्रधानांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहेत. आणि दुसरीकडे मित्रपक्षांनी पाठ फिरवल्यामुळे भाजप एकाकी पडलंय. त्यामुळे त्यांच्या मागणीला यश मिळण्याची शक्यता दुरापास्त आहे.

close