टँकरवर तहान भागवणारा मंगळवेढा दुष्काळाच्या यादीत नाही

August 23, 2012 3:51 PM0 commentsViews: 37

23 ऑगस्ट

मालदांडी ज्वारीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेला मंगळवेढा तालुका दुष्काळाच्या कठीण परिस्थितीतून जात आहे. सरकारने 123 तालुक्यांना दुष्काळग्रस्त जाहीर केलाय. पण त्यात मंगळवेढा तालुक्याचा मात्र समावेश करण्यात आला नाही. गेल्या पाच महिन्यांपासुन 53 टँकरद्वारे तालुक्याची तहान भागवली जातेय. 63 हजार जनावरे पोसण्यासाठी गावागावात चाराडेपो उभारण्यात आले असून आतापर्यंत 15 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत.

पिकपेरणीची आणेवारी पाहिली तर तालुक्यातील 81 गावांपैकी 72 गावांची आणेवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी लागली आहे. अशी भयावह परिस्थिती असताना मंगळवेढा तालुका राज्यशासनाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मात्र नाही. मंगळवेढ्याच्या नागरीकांनी गाव बंद ठेवून या गोष्टीचा निषेध केला आहे. सोलापूर जिल्ह्यातला सांगोला आणि मंगळवेढा या दोन तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून राज्य आणि केंद्र शासनाच्या जवळपास 12 पथकांनी भेट दिली. या पाहणीत त्यांनी 1972 पेक्षा जास्त भयावह परिस्थिती असल्याचा दुजोराही दिलाय. हे वास्तव असताना कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी राज्यशासनाला दुष्काळाचा रिपोर्ट सादर करताना तालुक्यातील यंदा 211 मीमी पावसाची नोंद झाली असं नमुद केलंय. तसेच 74 टक्के खरीपाची पेरणी झाल्याचंही नमुद केलंय. त्यामुळेच मंगळवेढा हे सरकारच्या दुष्काळग्रस्थ यादीत येऊ शकलं नाही.

close