हेमंत करकरेंवर अंत्यसंस्कार

November 29, 2008 4:36 AM0 commentsViews: 10

29 नोव्हेंबर, मुंबई 12. 30 pmहेमंत करकरेंना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजीपार्क स्मशानभूमीत जनसमुदाय लोटला होता. या जनसुदायात हेमंत करकरेंचे नातेवाईक, संपूर्ण पोलीस विभाग, करकरेंचा चाहता वर्ग होता. शासकीय इतमामात हेमंत करकरेंवरच्या अंत्यसंस्काराला सुरुवात झाली. पोलीस बॅण्ड वाजू लागला, बंदुकीच्या सलामीला सुरुवात झाली तसं वातावरण अधिकच शोकाकुल झालं. प्रत्येकाचं हृदय भरून येईल असा तो प्रसंग होता. करकरेंची पत्नी, त्यांच्या दोन मुली सायली आणि जुईली, मुलगा यांना अश्रूंना बांध घालणं अवघड जात होतं. पण कसाबसा त्यांनी स्वत:वर संयम ठेवला होता. त्या दरम्यान पोलीस आयुक्त हसन गफुर आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालक अनामी रॉय यांनी पत्रकार परिषद घेतली. " हेमंत करकरे यांची संगळी अर्धवट कामं पोलीस दल पुढे चालू ठेवणार. मालेगाव बॉम्बस्फोटांच्या तपासाचा आणि 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईत जी दहशतवादी कृत्य घडली आहेत त्यांचा छडा लावल्याशिवाय पोलीसदल स्वस्थ बसणार नाही. या स्फोटात जेवढे जेवढे म्हणून पोलीसदलाच्या माणसांना वीरमरण आलंय त्यांच्या कुटुंबाला पोलीसदल संरक्षण देणार, " असं पोलीस महासंचालक अनामी रॉय म्हणाले. " या दहशतवादी कृत्यांच्या घडामोडींची सगळी माहिती आम्ही जाहीर करू शकत नाही. तशी आम्हाला परवानगीही नाहीये. हॉटेल ट्रायडण्ट, नरिमन हाऊस आणि हॉटेल ताजमधल्या दहवशतवादी हल्ल्यात एकूण 150 मृतदेह सापडले आहेत. अजून मृतदेह सापडण्याची शक्यता आहे. या दहशतवादी कृत्यात एकूण 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं असून एका दहशवाद्याला जिवंत पकडलं आहे," अशी माहिती पोलीस आयुक्त हसन गफुर यांनी दिली. 29 नोव्हेंबर, मुंबईविनोद तळेकर11.55 AMहेमंत करकरेंना निरोप देताना दादर स्मशानभूमीतलं वातावरण अतिशय शोकाकुल झालं आहे. शहीद हेमंत करकरेंना मानवंदना देण्यासाठी रॉयल पोलीस बँड येथे पोहचला आहे. थोड्याच वेळात त्यांना शासकीय इतमामात सलामी दिली जाईल. हेमंत करकरेंचे सर्व सहकारी, वरिष्ठ अधिकारी तसंच अनेक राजकीय नेते त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी येथे उपस्थित आहेत. येथ जमलेले नागरिक देशभक्तीपर घोषणा देत आहेत आणि रॉयल पोलीस बँडवर देशभक्तीपर गीते वाजवली जात आहे. शहीद हेमंत करकरे यांच्या असामान्य शौर्यामुळे प्रत्येकाचा उर अभिमानानं भरून आला आहे, पण त्याच वेळी त्यांच्या आठवणीनं प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत. 29 नोव्हेंबरसुधाकर कांबळे 10.30 amहेमंत करकरेंना अनेक जणांनी जवळून पाहिलं आहे. त्यातलेच एक आहेत आयबीएन लोकमतचे सिनिअर रिपोर्टर सुधाकर कांबळे. हेमंत करकरेंच्या आठवणीं सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. सुधाकर कांबळे सांगतात – " हेमंत करकरेंविषयी सांगावं तेवढं थोडं आहे. करकरे जवढे माणूस म्हणून चांगले होते तेवढे ते अधिकारी म्हणून चांगले होते. के.पी. रघुवंशी यांच्यानंतर मुंबई एटीएसचा चार्ज त्यांनी स्वीकरला. मुंबई एटीएसची सुत्रं स्वीकारल्यानंतर करकरेंच्या मीतभाषी स्वभामुळे त्यांच्या कामावर शंका घेतल्या जात होत्या. कारण करकरे कोणाशी फारसे बोलायचे नाहीत. आपलं काम भलं नी आपण भलं असा त्यांचा पींड होता. अहमदाबाद तसंच मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोटांनी त्यांना प्रचंड अस्वस्थ करून सोडलं. त्या स्फोटातल्या गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस करून काम केलं. मुंबईत राहून त्यांनी गुजरात एटीएसला बॉम्बस्फोटांचा छडा लावण्यासाठी प्रचंड मदत केली. त्यावेळी त्यांच्या कामाने पत्रकार, पोलीसअधिकारी, सामान्य माणसं आश्चर्यचकीत झाली. त्यावेळी आमच्या सगळ्यांच्या मनात असणारा करकरेंविषयीचा आदर आणखीनच वाढला… बुधवारी रात्री चकमकीत झालेल्या या धाडसी आणि कर्तव्यतत्पर अधिकार्‍याचा असा शेवट व्हावा ही दुदैर्वाची गोष्ट आहे. " 29 नोव्हेंबर, मुंबई मनाली पवार, विनायक गायकवाड10.00 amवन्दे मातरम्… हेमंत करकरे अमर रहे… असे नारे हिंदू कॉलनीमध्ये एटीस प्रमुख हेमंत करकरे यांच्या निवास्थानी निनादत होते. हेमंत करकरेंच्या पार्थिवावर तिरंगा पांघरला गेला. ज्या वरदीशी प्रामाणिक राहून हमेंत करकरेंनी शेवटच्या घटकेपर्यंत काम केलं होती ती वरदी त्या तिरंगा पांघरलेल्या करकरेंच्या पार्थिवावर ठेवण्यात आली आणि थोड्यावेळातच वातावरण जास्त गंभीर झालं. शहीद हेमंत करकरेंचं पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये ठेवण्यात आलं. शासकीय इतमामात करकरेंच्या अंत्ययात्रेने हिंदू कॉलनीचा निरोप घेतला. त्या अंत्ययात्रेत राजकीय नेते, पोलीस अधिकारी, हेमंत करकरेंचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार, शेजारी-पाजारी असे सगळे सामील झाले होते. अनेकांचे अश्रू आवरत नव्हते. करकरे आपल्यात नाहीत यावर अनेकांचा विश्वासच बसत नव्हता…. 9.30 AMबुधवार 26 नोव्हेंबरपासून दहशतवाद्यांचा बीमोड करताना शहीद झालेले मुंबई एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. करकरेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त हसन गफुर, राज्यपाल एस.जी. जमीर, नारायण राणे, गुहमंत्री आर. आर. पाटील, मुंबईच्या महापौर शुभा राऊळ, समाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, अभिनेता राहुल बोस, माजी पोलीस कमिशनर पसरीचा यांच्यासारखे अनेक सामाजिक, राजकीय आणि पोलीस दलातील अधिकारी उपस्थित आहेत. हेमंत करकरेंच्या कुटंबीयांचं सांत्वन करत आहेत. करकरेंचं बलिदान व्यर्थ जाऊ नये – राजदीप सरदेसाई29 नोव्हेंबर, मुंबई हेमंत करकरेंविषयी बोलताना सीएनएन आयबीएनचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई म्हणाले "हेमंत करकरे यांनी असामान्य शौर्य दाखवलं. त्यांनी देशातल्या सामान्य माणसाच्या सुरक्षिततेसाठी बलिदान केलं. पोलीस दलातील प्रत्येक कर्मचार्‍यासमोर हेमंत करकरेंनी आदर्श घालून दिला आहे.""या दहशतवादी हल्ल्यानं मुंबईतल्या एलिट क्लासला हादरवून टाकलंय. सामान्य मुंबईकर तर गेले कित्येक वर्ष या दहशतीच्या छायेत वावरतोय. आज करकरेंच्या अंत्ययायेत्रेला मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिक जमले आहेत. पण आज गर्दी करून आपण उद्या त्यांना विसरलो, तर ही एक मोठी शोकांतिका ठरेल. हेमंत करककरेंनी देशाच्या सुरक्षिततेसाठी बलिदान केलं आहे. आज त्यांच्या पश्चात देशाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली आहे, सामान्य माणसाची आहे. करकरेंच्या बलिदानानं सामान्य माणसाच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली आहे. ही ज्योत विझू न देता सगळ्यांनी एकत्र येऊन एकजूटीनं दहशतवादाचा मुकाबला केला, तरच ती शहीद हेमंत करकरे यांना खरी श्रद्धांजली असेल."

close