भाजप स्वत:च्या अस्तित्वासाठी ब्लॅकमेलिंग करते -सोनिया गांधी

August 28, 2012 5:24 PM0 commentsViews: 6

28 ऑगस्ट

काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. भाजपला उत्तर देण्यासाठी पंतप्रधानांनंतर आता सोनिया गांधींही मैदानात उतरल्या आहेत. संसदेला वेठीला धरुन भाजप नकारात्मक राजकारण करत असल्याचा थेट आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. सोनिया गांधींनी आज काँग्रेस संसदीय दलाच्या बैठकीत बोलत होत्या. भाजपला लोकशाहीविषयी आदर नाही हे त्यांच्या गोंधळावरुन सिद्ध झाल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. ब्लॅकमेलिंग हे भाजपचे राजकीय अस्तित्व टिकवण्याचं साधन बनलंय,अशा कठोर शब्दात सोनिया गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते ज्याप्रकारे असभ्य शब्दांचा वापर करतायत ते अयोग्य असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

कोळसा खाण घोटाळ्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात सुरू झालेला वाद आता शिगेला पोचला आहे. काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी संसदीय पक्षाची बैठक घेतली. या बैठकीत सोनिया आक्रमक झाल्या. त्या म्हणाल्या, भाजपच्या बेताल आरोप आणि नकारात्मक राजकारणाविरोधात लढा देण्याची गरज आहे. ते संसदेला वेठीला धरत आहे. विरोधी पक्षनेत्यांनी वापरलेल्या शब्दांचा मी निषेध करते. आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आगामी निवडणुकीत त्यांना सडेतोड उत्तर दिलं पाहिजे, त्यांचा सफाया करायला हवा. ब्लॅकमेल करणं ही त्यांची राजकीय गरज बनली आहे. आम्ही सांगतो तेच करा, दुसरा पर्याय खपवून घेणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे.टू जी घोटाळा किंवा अण्णांच्या आंदोलनावेळी काँग्रेस बॅकफुटवर होती. पण यावेळी मात्र तसं नाही. यावेळी पंतप्रधानांना लक्ष्य करण्यात आलंय आणि पंतप्रधानांवर हल्ला म्हणजे थेट पक्ष आणि सोनिया गांधींवर हल्ला हे काँग्रेसला पुरतं ठाऊक आहे. शिवाय राहुल गांधींकडे नेतृत्त्वाची धुरा सोपवायची असल्यामुळे काँग्रेसलाही आक्रमक दिसणं गरजेचं आहे.

तिकडे संयुक्त जनता दल आणि अकाली दलानं विरोध केला असतानाही भाजपनंही आपली भूमिका अधिक कठोर केलीय. गुजरात, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका होऊ घातल्याहेत. अशावेळी 'भ्रष्ट पंतप्रधान' ही घोषणा भाजपसाठी संजीवनी ठरण्याची शक्यता आहे.

भाजपने काँग्रेसची दुखरी नस पकडलीय. त्यामुळे काँग्रेसने रस्त्यावरची लढाई लढायचा निर्णय घेतलाय. गरज पडली तर विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायचीही त्यांची तयारी आहे.

कोळसा खाण वाटपाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि भाजपची काय रणनीती आहे ?

भाजपची पुढची रणनीती- संसदेत चर्चा करायला नकार, रस्त्यावर उतरणार- देशभर मोर्चे काढणार, पंतप्रधान, यूपीएला लक्ष्य करणार, निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती- पंतप्रधानांना लक्ष्य करण्यासाठी अण्णाद्रमुकसारख्या पक्षांची मोट बांधणारकाँग्रेसची पुढची दिशा- भाजपविरोधात देशभर निषेध मोर्चे काढणार- कोळसा खाणींचा लिलाव करायला भाजपशासित राज्यांचाच विरोध असल्याचं जनतेला सांगणार – प्रवक्ते आणि मंत्री पंतप्रधान आणि सरकारचा बचाव करणार – संसदेत डावे, समाजवादी पक्ष, बसपा आणि मित्रपक्षांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न – विश्‍वासदर्शक ठरावाच्या शक्यतेवर विचार – नंबर गेमच्या माध्यमातून विरोधकांची हवा काढायचा प्रयत्न

close