मुंबईत पावसाचे धुमशान, जनजीवन विस्कळीत

September 3, 2012 3:28 PM0 commentsViews: 13

03 सप्टेंबर

मुंबईत गेल्या 24 तासात पावसाने धुमशान घातले आहे. त्यामुळे शहरातलं जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे. सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर.. या मुंबईतल्या तिन्ही रेल्वे लाइन्स तब्बल दीड तास उशिराने सुरू आहेत. वेस्टर्न रेल्वेवर लोकलच्या तीस फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. तर मध्य रेल्वेवर 25 फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. वेस्टर्न रेल्वेवर सांताक्रूझजवळ रेल्वे रुळाला तडा गेला आहे. या तिन्ही लाईनवर अनेक स्थानकांमध्ये सिग्नलमध्येही बिघाड झालंय.

हार्बर लाईनवर कुर्ला आणि टिळकनगर दरम्यान पाणी साठलं आहे. इतकंच नाही तर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झालीय. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मुंबई शहरात 93.4 मिमी, पूर्व उपनगरात 141.8 मिमी तर पश्चिम उपनगरात 127.8 मिमी पाऊस पडलाय. मालाड, गोरेगाव, कुर्ला, सांताक्रुझ आणि अंधेरीत ट्रॅफिक जाम झालेत. त्यामुळे इस्टर्न एक्स्प्रेस, वेस्टर्न एक्स्प्रेस आणि एलबीएस रोड या तिन्ही महत्त्वाच्या रस्त्यांवर गाड्यांचा रांगा लागल्या आहेत. चुनाभट्टीत नारायण हटके चाळीवर दरड कोसळल्याने 4 जण जखमी झाले आहे. ठाणे, डोंबिवली आणि नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरू आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे.. तानसा आणि मोडकसागर तलाव भरून वाहू लागले आहेत. येत्या काही तासातही अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेनं दिला आहे.

10 जूनला मान्सूनचे आगमन झाले आठवडाभर बर्‍यापैकी पाऊस झाला. पण त्यानंतर वरुणराजे जे रुसले ते अधून मधून बरसत राहिले. आठवडा आठवडाभर तर दर्शनच दिले नाही. अखेर आता सप्टेंबर महिना आला बाप्पांचे आगमन आणि वरुणराजाच्या निरोपाचा वेळ जवळ आला असताना पावसाने जाता-जाता मुंबईकरांना खूष केलं आहे. मागिल आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर काल रविवारी रात्रीपासून मुक्काम ठोकला आहे. दिवसभर मुंबईसह उपनगर,ठाणे,कल्याणमध्ये पावसाच्या सततधार सुरु होत्या.

अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे लोकांची पुरती तारांबळ उडाली आहे. तर दुसरीकडे वाहतुकीची कोंडी झाली आहे. कल्याण, डोंबिवली, गोरेगावमधील आरे कॉलनी, जवाहर नगर, जुहू गल्ली, मालाड पूर्व, कुर्ला पश्चिम आणि अंधेरी पूर्व भागातील काही ठिकाणी पाणी साचले आहे. पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला सेंट्रल रेल्वे 25 ते 30 मिनिटं उशीराने धावत आहे तर वेस्टर्न रेल्वे 10 मिनिटं आणि हार्बर रेल्वे 20 मिनिटं उशीरा धावत आहे. पण या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या धरणांच्या क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तानसा धरण आता पूर्णपणे भरलं आहे. भातसा धरण सध्या 86 टक्के भरलंय. गेले आठवडाभर धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडतोय. पाऊस असाच सुरु राहिला तर मुंबईत सध्या सुरू असलेली 10 टक्के पाणीकपात रद्द होण्याची शक्यता आहे.

close