महिला पोलिसांचा विनयभंग करणार्‍या चौघांना अटक

September 4, 2012 5:39 PM0 commentsViews: 4

04 सप्टेंबर

मुंबईत 11 ऑगस्टला सीएसटी परिसरात झालेल्या हिंसाचारात महिला पोलिसांचा विनयभंग करणार्‍या चार जणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांनी आज चार जणांना अटक केली आहे. त्यांची ओळख सुध्दा पटली आहे. 11 ऑगस्टला आसाम दंगलीचा निषेध करण्यासाठी रझा अकादमी या संघटनेनं मोर्चा काढला होता. आझाद मैदानावर सभा झाल्यानंतर हिंसक जमावाने परिसरातील वाहनांची तोडफोड केली. तसेच बेस्ट बसेस,मीडियाच्या ओबी व्हॅनला टार्गेट करुन पेटवून दिले. हा हिंसक जमाव एवढ्यावरच थांबला नाही त्यांनी पोलिसांच्या बंदुका पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तसेच महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकारही घडला.ज्या शहिद जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावून 26/11 च्या दहशतवाद्यांना यमसदनी धाडले त्या शहिद जवानांच्या अमर जवान स्माकराचीही दंगेखोरांनी तोडफोड केल्याची घटनाही घडली. या घटनेच्या प्रकरणी राजकीय पक्षांनी गृहखात्यावर हल्लाबोल केला. आणि गृहमंत्री आर.आर.पाटील आणि पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अरुप पटनायक यांची बढती करुन बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी अजूनही दंगेखोरांना अटक करण्याचे सत्र सुरुच आहे.

close