कोणताही पक्ष काढणार नाही – अण्णा

September 6, 2012 1:27 PM0 commentsViews: 2

06 जुलै

मी कोणताही पक्ष काढणार नाही, मला कोणतीही निवडणूक लढवायची नाही फक्त जनतेला पर्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. एका पत्राद्वारे अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जंतरमंतरवर राजकीय पक्षाची घोषणा केल्यानंतर अण्णांनी पुन्हा एकदा राजकारणापासून आपण चार हात दूर राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.

मागिल महिन्यात जंतरमंतर येथे टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल,मनीष सिसोदिया उपोषणाला बसले होते. आपल्या सदस्यांच्या चार दिवसांच्या उपोषणानंतर अण्णांही उपोषणात सहभागी झाले. सात दिवसानंतर टीम अण्णांनी उपोषण सोडले ते राजकीय पक्षाची घोषणा करुनच. पण यावेळी अण्णांनी राजकारणात आपण उतरणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आणि दुसर्‍याच दिवशी अण्णांनी टीम अण्णा बरखास्त केली. पण अरविंद केजरीवाल यांनी राजकीय पक्षाची घोषणा करत कामालाही लागले आहे. या आंदोलनानंतर अण्णा राळेगणला परतले पण महिनाभर माध्यमांशी बोलणं टाळलं. या काळात केजरीवाल यांनी दिल्लीत भाजपच्या नेत्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पण केजरीवाल यांच्या रॅलीला किरण बेदी यांनी विरोध केल्यामुळे टीममधले मतभेद चव्हाट्यावर आले. आता महिनाभरानंतर अण्णा पुन्हा मैदानात उतरले आहे. आपल्याला राजकारण उतरण्याची इच्छा नाही. आपण राजकीय पक्ष काढणार नाही आणि निवडणूक लढवणारही नाही असं स्पष्ट करत पुढच्या दीड वर्षात लोकशिक्षण आणि जनजागृतीचं काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच नव्या पर्यायासाठी कार्यकर्त्यांनी पुढं यावे चारित्र्यवान उमेदवारांना निवडून पाठवा, असं आवाहन अण्णांनी केलं आहे.

अण्णांचं पत्र"एक गोष्ट प्रकर्षानं जाणवतेय की भ्रष्टाचाराची प्रकरणं आली, पाठपुरावा केला आणि काही लोकांना न्याय मिळाला. पण याच मर्यादित पद्धतीनं पुढेही हे आंदोलन चालू राहिलं तर तक्रार निवारण केंद्र आणि या आंदोलनात फारसा फरक राहणार नाही. आयुष्यभर तक्रार निवारणाचं काम करत राहिलो तर कार्यकर्त्यांसह आमचं आयुष्य संपेल, मात्र भ्रष्टाचार संपणार नाही असं वाटू लागलंय. म्हणून या आंदोलनाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य आणि देशाच्या परिवर्तनासाठी, भ्रष्टाचारमुक्त भारत निर्मितीसाठी विधानसभा आणि लोकसभेत फक्त पक्ष न पाहता चारित्र्यवान लोकांना निवडून पाठवणं हाच एकमेव पर्याय आहे. पुढच्या दोन महिन्यांनंतर दीड वर्ष प्रत्येक राज्यात जाऊन मी लोकशिक्षण, लोकजागृतीचं कार्य करणार आहे. किती यश मिळेल माहीत नाही. जर पराभव झाला तर तो अण्णा हजारेंचा पराभव नसून जनतेचा पराभव ठरणार आहे. महाराष्ट्रातल्या चारित्र्यवान कार्यकर्त्यांनी पुढे यावं. कोणताही पक्ष काढण्याची इच्छा नाही. निवडणूक लढवायची नाही. फक्त जनतेला पर्याय द्यायचा आहे. कारण परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती फक्त जनतेच्या हाती आहे."- अण्णा हजारे

close