कोळसा खाण घोटाळ्यात खा. नवीन जिंदल अडचणीत

September 6, 2012 5:02 PM0 commentsViews: 14

भूपेन चौबे, नवी दिल्ली

06 सप्टेंबर

कोळसा खाण घोटाळ्यात संसदेचे पावसाळी अधिवेशन पुरतं धुवून निघालंय. पण घोटाळ्याच्या या खाणी जितक्या खणाल, तितका गैरव्यवहाराचा कोळसा बाहेर येतोय. आयबीएन नेटवर्कच्या हाती आणखी काही महत्त्वाची माहिती लागलीय. या माहितीनुसार केंद्र सरकारने आपल्याच मालकीच्या कोल इंडिया लिमीटेड या कंपनीला देशात कोळसा खाण दिली नाही. उलट काँग्रेसचेच खासदार नवीन जिंदल यांच्या खाजगी कंपन्यांना मात्र नियम डावलून खाणी देण्यात आल्या.

आयबीएन नेटवर्कच्या हाती लागलेल्या या एक्सक्लुझिव्ह कागदपत्रांमुळे काँग्रेसचे आणखी एक खासदार नवीन जिंदल अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 27 फेब्रुवारी 2009 रोजी दोन खाजगी कंपन्यांना ओडिशामध्ये दोन मोठ्या कोळसा खाणी मिळाल्या. एक कोळसा खाण 300 मेगा मेट्रिक ची तर दुसरी पंधराशे मेगा मेट्रिक टनची… या दोन कोळसा खाणींची किंमत आहे 2 लाख कोटींच्याही वर.

यापैकी एक खाण काँग्रेस खासदार जिंदल यांची कंपनी असलेल्या जिंदल स्टील अँड पॉवर या कंपनीला देण्यात आली. 2009 मध्ये ही खाण देण्यात आली. विशेष म्हणजे.. कोळसा खाण वाटपाची शेवटची तारीख उलटून गेल्यावर हे वाटप करण्यात आलं.

दुसरीकडे कोल इंडिया लिमिटेड या सरकारच्याच नवरत्न कंपनीला कोळसा खाणीसाठी झगडावं लागतंय. कोल इंडियाने कोळसा खाण मिळावी, यासाठी अशी असंख्य पत्रं सरकारला पाठवली. पण तिला भारतात खाण देण्याऐवजी मोझांबिकमधली कोळसा खाण देण्यात आली. त्यामुळे खासदाराच्या कंपनीला देशात कोळसा खाण मिळते. पण सरकारी कंपनीला परदेशात जावं लागतं, यामागचं कारण काय, हा खरा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर देणं सरकारला कठीण जाईल, हे मात्र नक्की…

close