भारत – पाक सीमेवर तणावाची स्थिती

November 30, 2008 10:36 AM0 commentsViews: 5

30 नोव्हेंबर, नवी दिल्ली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानानं भारताला युद्धजन्य स्थितीचा इशारा दिल्याची माहिती मिळतेय. पाक लष्कराने त्यांचं अफगाण सीमेवरचं एक लाख सैन्य भारताच्या सीमेवर हलवण्याची तयारी सुरू केली आहे. पाकची ही सैन्य हलवण्याची तयारी म्हणजे भारत-पाक युद्धाचं रणशिंग फुंकलं गेल्यासारखंच आहे.पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान अफगाणिस्तानच्या सीमेवरचं जवळपास एक लाख सैन्य भारताच्या सीमेकडं हलवण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या उच्च सुरक्षा अधिकार्‍यानं याचे संकेत दिलेत. मुंबईतल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांत तणाव वाढला तर ही कारवाई करण्यात येणार आहे. नाटो आणि अमेरिकेच्या फौजांना पाकिस्तान सरकारनं अफगाणिस्तानवर लक्ष देणं शक्य नसल्याचं सांगितलंय, अशी माहिती मिळतेय. पुढचे दोन दिवस निर्णायक असल्याचं पाकिस्तानच्या एका उच्चाधिकार्‍यानं सांगितलंय. मुंबईवर अतिरेकी हल्ला करण्यासाठी कराचीहून समुद्रमार्गे आल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईत 60 तासांहून अधिक काळ चाललेल्या थरारनाट्यात मोहम्मद अजमल हा एकमेव अतिरेकी जिवंत सापडलेला आहे. चौकशीत मोहम्मद अजमलनं कराचीहून आल्याचं सांगितलंय. मुंबईवर झालेल्या या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ गिलानी यांच्याशी शुक्रवारी दूरध्वनीवरुन चर्चा झाली. शुजा पाशा यांना तपासात सहकार्य करण्याची तयारी गिलानी यांनी दाखवली होती. पण आयत्यावेळी पाकने शब्द फिरवला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभमूवर पाकिस्ताननं भारताला युद्धजन्य स्थितीचा इशारा दिल्याची माहिती मिळत आहे.

close