‘राहुल नेतृत्वासाठी अजून अक्षम’

September 12, 2012 4:49 PM0 commentsViews: 5

12 सप्टेंबर

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या मैत्रीत फूट पडताना दिसतेय. समाजवादी पक्षाने आज थेट काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्यावरच तोफ डागली. देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता राहुल यांच्यात नाही, अशी टीका समाजवादी पक्षाचे सरचिटणीस मोहन सिंह यांनी केली. समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची कोलकात्यात सभा सुरू आहे. त्यात पक्षाने तिसर्‍या आघाडीचे संकेत दिलेत.

केंद्रात काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देणार्‍या समाजवादी पक्षाने आगामी सार्वत्रिक निवडणुकीची दिशा स्पष्ट केलीय. कोलकत्यात पक्षाच्या दोन दिवसीय कार्यकारिणीची सभा होतेय. या सभेची सुरुवातच पक्षानं थेट राहुल गांधींवर तोफ डागत केली.

उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी विरुद्ध अखिलेश यादव असा थेट सामना होता. पण त्यावेळीसुद्धा समाजवादी पक्षाने राहुल गांधींवर प्रत्यक्ष टीका केली नव्हती. पण आता परिस्थिती बदलल्याचे स्पष्ट संकेत समाजवादी पक्षाने दिलेत.

देशात काँग्रेसविरोधी लाट आहे आणि याचा फटका समाजवादी पक्षालाही बसेल, अशी भीती समाजवादी पक्षाच्या काहींना वाटतेय. आणि म्हणूनच आता मुलायम सिंह तिसर्‍या आघाडीची जुळवाजुळव करताना दिसत आहेत. पण राजकारणात सतत रंग बदलणार्‍या मुलायम सिंह यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते विश्वासार्हतेचं..

मुलायम यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ?

- 2004 मध्ये त्यांना यूपीएला बाहेरून पाठिंबा द्यावा लागला- डाव्या पक्षांनी पाठिंबा काढून घेतला तेव्हा मुलायमनी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला- राष्ट्रपती निवडणुकीदरम्यानही मुलायम सुरुवातीला ममता बॅनजीर्ंसोबत होते- पण नंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसला पाठिंबा दिला- आता पुन्हा एकदा त्यांनी डाव्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केलाय

उत्तर प्रदेशात मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले अखिलेश यादव, अजूनही राज्यात आपला ठसा उमटवू शकलेले नाहीत. त्यामुळे मुलायम यांची खरी परीक्षा असेल ती त्यांच्याच होम ग्राऊंडवर…

राहुल गांधी प्रचारात उतरणार नाही ?

दरम्यान, गुजरातमध्ये या वर्षाअखेर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी उतरणार नाहीत, अशी माहिती मिळतेय. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आता नरेंद्र मोदींविरोधात राहुल गांधींना न उतरवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर लढवायची, तिला नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी, असा रंग द्यायचा नाही, अशी काँग्रेसची रणनीती असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राहुल गांधी यांची युवा सदस्य नोंदणी मोहीमही फसलीय. त्यामुळे काँग्रेस राहुल गांधींबाबत आता अतिशय सावध पावलं उचलतंय.

close