असीम त्रिवेदीची जामिनावर सुटका

September 12, 2012 9:28 AM0 commentsViews: 4

12 सप्टेंबर

व्यंगचित्रकार असीम त्रिवेदीची आज अखेरीस जामिनावर सुटका झाली. त्याच्या स्वागतासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या अनेक तरुण कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पण असीम सुटला असला.. तरी त्याच्यावर लावलेला देशद्रोहाचा खटला मात्र मागे घेण्यात आला नाहीये. कलम 124 अ विरुद्धची लढाई या पुढेही सुरूच राहील असं त्याने आज बाहेर आल्यानंतर जाहीर केलं.

व्यंगचित्रांनी वादळ निर्माण करणारा असीम अर्थर रोड जेलमधून बाहेर पडला. तेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे शेकडो कार्यकर्ते त्याच्या स्वागतासाठी जमले होते. देशातल्या भ्रष्टाचारावर बोट ठेवणारी व्यंगचित्रं काढली, म्हणून या तरुणाविरोधात देशद्रोहाचा खटला भरण्यात आला. जोपर्यंत हे ब्रिटिश कालीन कलम मागे घेतलं जात नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील, असं असीमने जाहीर केलं.

असीमने काढलेल्या एका व्यंगचित्रात घटनेचा अपमान झाला, म्हणून तो दलित विरोधी असल्याची ओरड काही संघटनांनी केली होती. त्यांना उत्तर देण्यासाठी असीमने थेट बुद्धविहारात जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं.

अनेक सामाजिक कार्यकर्ते त्याच्या पाठीशी उभे राहिले. देशद्रोहाच्या खटल्याचा सामना केलेले सामाजिक कार्यकर्ते बिनायक सेनही त्याच्या स्वागतासाठी मुंबईत आले होते.

अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि अनेकांनी पाठिंबा दिल्यामुळे सरकारवर दबाव वाढलाय. त्यामुळे असीमवर लावण्यात आलेला देशद्रोहाचा खटला राज्य सरकार मागे घेईल, अशी सूत्रांची माहिती आहे. पण या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारची नाचक्की झाली, हे स्पष्ट आहे.

close