नरेंद्र मोदींचं मिशन इलेक्शन सुरु

September 11, 2012 11:17 AM0 commentsViews: 1

11 सप्टेंबर

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. नरेंद्र मोदी आजपासून विवेकानंद युवा विकास यात्रेवर निघाले आहेत. मेहसाना जिल्ह्यातल्या बीचारजी या गावापासून त्यांनी यात्रेला सुरुवात केलीय. पुढच्या 1 महिन्यात ते संपूर्ण गुजरात पिंजून काढणार आहेत. आपल्या पहिल्याच रॅलीत त्यांनी केंद्रसरकार आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. पण 2007 ची निवडणूक मोठ्या मताधिक्क्याने जिंकणार्‍या मोदींसाठी 2012ची निवडणूक सोपी नाही.

गुजरातमध्ये या वर्षाअखेर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचं रणशिंग मोदींनी फुंकलंय. सद्भावना यात्रेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी एका वर्षाच्या आतच दुसर्‍या यात्रेवर निघालेत. विवेकानंद युवा विकास यात्रा. त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना ते त्यांच्या खास शैलीने प्रत्युत्तर देत आहे. त्याची सुरुवात त्यांनी काँग्रेस आणि सीबीआयपासून केली.

नरेंद्र मोदी म्हणतात, येणार्‍या निवडणुकीत काँग्रेस आणि सीबीआय एकत्र माझ्याविरोधात लढतील.

अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने त्यांच्या यात्रेची दखलही घेतली.. आणि त्यांच्यावर जळजळीत शब्दांत टीकाही केली. मोदींच्या या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेमुळे भाजपच्या अनेक गटांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच.. राज ठाकरेंना जवळ केल्यामुळे त्यांनी शिवसेनेला दुखावलंय. आता सेनाही गुजरात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यातच मोदींचे एनडीएतले विरोधक नितीश कुमारही आता गुजरात विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत. याशिवायही.. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे.

मोदींचा मार्ग खडतर ?

- नरोडा-पाटिया दंगल प्रकरणी मोदी सरकारमधल्या माजी मंत्री माया कोडनानी यांना शिक्षा- संजय जोशी प्रकरणानंतर संघ परिवार नाराज- निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी संघाची बडोद्यात बैठक, पण मोदींना निमंत्रण नाही- एकेकाळचे भाजप नेते केशुभाईंनी यावेळी वेगळी चूल मांडलीय- कारखानदारांना स्वस्त दरात जमिनी दिल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये असंतोष

राष्ट्रीय झेप घेण्यासाठी ही विधानसभा निवडणूक मोदींसाठी महत्त्वाची आहे. पण विरोधकांपेक्षा स्वकीयांमुळेच.. त्यांना ती कठीण होण्याची शक्यता आहे.

close