गोव्यात सर्व खाणींचे परवाने निलंबित

September 12, 2012 4:33 PM0 commentsViews: 2

12 सप्टेंबर

गोव्यातल्या खाणी बंद करण्याचा निर्णय मनोहर पर्रीकर यांनी घेतला आणि केंद्रीय स्तरावरही चक्रं फिरली. केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन आज तातडीने गोव्याला आल्या आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय पर्यावरण आणि खाण मंत्रालयाने गोव्यातल्या सर्व खाणींचे पर्यावरण विषयक परवाने निलंबित केले आहेत, असं त्यांनी जाहीर केलं. जोपर्यंत खाणमालक आपली खाण कायदेशीर असल्याचे पुरावे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला सादर करणार नाहीत तोपर्यंत हे परवाने निलंबित ठेवण्यात येतील आणि खाण बेकायदेशीर आढळल्यास कायमची बंद केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी खनिज साठ्यांच्या वाहतुकीला आणि व्यापाराला परवानगी का दिली असा सवालही जयंती नटराजन यांनी केला. या सर्व खनिज साठ्यांना पर्यावरणाचा दाखला नसेल तर ते अवैध ठरवण्यात येतील असं पत्र केंद्रानं गोवा सरकारला लिहिलंय. त्यामुळे खाणींच्या मुद्द्यावरून आता काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष सुरू झालाय.

close