बेकायदेशीर 4 कोळसा खाणीचे परवाने रद्द

September 13, 2012 4:24 PM0 commentsViews: 27

13 सप्टेंबर

कोळसा खाण वाटप घोटाळ्यावरून सध्या वाद पेटलाय आणि अखेर केंद्र सरकारने बेकायदा कोळसा खाणींचं वाटप रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बेकायदेशीरपणे मिळवलेल्या चार कोळसा खाणींचं कंत्राट रद्द होणार आहे. या विषयी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाने कोळसा मंत्रालयाकडे 4 कोळसा खाणींचं वाटप रद्द करण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस कोळसा मंत्रालयाने स्वीकारली आहे. यातल्या दोन खाणी महाराष्ट्रातल्या आहेत. या कंपन्यानी खाणी मिळवल्या पण प्रकल्प सुरूच केले नसल्याचं मंत्रिगटाचं म्हणणं आहे. आणखी तीन कंपन्यांची बँक गॅरंटी रद्द करण्याची शिफारसही मंत्रिगटाने केली आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेला मंत्रिगट एकूण 29 कोळसा खाणींच्या वाटपाचा अभ्यास करतंय. यापैकी आठ खाणींच्या वाटपाची चौकशी पूर्ण झाली आहे.

या 4 खाणींचं वाटप होणार रद्द- कॅस्ट्रॉन मायनिंग लि. – मेसर्स फिल्डमायनिंग अँड इस्पात लि. – चिनोरा, महाराष्ट्र- मेसर्स फिल्डमायनिंग अँड इस्पात लि. – वरोरा, महाराष्ट्र- लालगड कोळसा खाण – प. बंगाल

दरम्यान, कोळसा खाणींवर करण्यात आलेल्या या कारवाईवर भाजप समाधानी नाही. सर्वच्या सर्व 143 कोळसा खाणींचं वाटप रद्द करावं आणि पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अशी भाजपची मागणी आहे. त्यासाठी आता भाजप देशभर फिरून याविरोधात आंदोलन करणार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आज दिल्लीत पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीत पुढच्या आंदोलनाची रणनीती ठरवण्यात आली.

close