डॉ. विजय घैसास हत्येप्रकरणी आरोपींची निर्दोष सुटका

September 15, 2012 10:24 AM0 commentsViews: 15

15 सप्टेंबर

डॉ. विजय घैसास खून प्रकरणी दोन्ही आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. या धक्कादायक निकालामुळे दिवंगत डॉक्टरांच्या पत्नी वासंती घैसास यांना मोठा धक्का बसला असून आरोपी मोकाट सुटल्याने त्या हतबल झाल्या आहे. पोलिसांनी नीट तपास न केल्यामुळे आरोपी सुटल्याचा आरोप वासंती घैसास यांनी केला. आता न्यायाकरता दाद कुणाकडे मागायची असा सवाल त्यांनी केला आहे.

16 जून 2008…वेळ सकाळचे 9 वाजलेले… प्रभात रस्त्यावरील बंगल्यात 40 वर्ष वैद्यकीय सेवा केलेल्या डॉ. विजय घैसास यांची अमानुष हत्या करण्यात आली. बंगल्यात डॉ. एकटे होते. त्यांच्या पत्नी आणि मुलं अमेरिकेत होते. पोलिसांनी 5 दिवसांनी डॉक्टरांकडे पूर्वी कामाला असलेल्या बाईचा नातू सुनील सुरेश बोध आणि नेपाळचा रहिवासी असलेला चंदर शिवलाल शर्मा यांना अटक केली. पैशाकरता ही हत्या झाल्याचं पोलिसांतर्फे सांगण्यात आलं. या तपासाकरता अधिकारी कर्मचार्‍यांना रोख रकमेची बक्षीसही जाहीर करण्यात आलं. हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी उत्तर प्रदेशातील रामू बाधा ऊर्फ चन्नू कोटोरिया मात्र सापडला नाही. केस स्ट्रॉंग असल्याचं पोलीस आणि सरकारी वकील सांगत होते पण नुकताच म्हणजे 24 ऑगस्टला शिवाजीनगर न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निकालाने वासंती घैसास हादरून गेल्यात. आधीच पतीच्या हत्येचं दु:ख त्यात मरणोत्तर न्यायही नाही. घैसास या हतबल झाल्यात. त्यातच आरोपी मोकाट सुटल्यानं जीवाची भीती.. घैसास यांनी आपली कैफीयत आयबीएन लोकमतकडे मांडली पण चेहरा न दाखवता.

न्यायालयाच्या निकालपत्रानुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपासच नीट केला नाही. अनेक गंभीर त्रुटी तपासात राहील्या. पोलीस आणि सरकारी वकिल यांच्या गलथानपणामुळेच तिसरा आरोपी सापडला नाही तसेच आरोपींनी हत्येची कबुली देऊनही पकडलेले दोन्ही आरोपी निर्दोष सुटले. आता वरच्या कोर्टात अपिल करू असं पोलीस म्हणत असले तरी न्याय मिलेल का ? केस पुन्हा रीओपन होईल का ? फरारी आरोपीला पोलीस पकडतील का ? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. आरोपी मोकाट अशा परिस्थीतीत आपण दाद कुणाकडं मागायची असा टाहो या निवृत्त शास्त्रज्ञ- पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या ज्येष्ठ महीलेनं फोडला आहे. आरोपींच्या वकीलांनी मात्र हा निकाल अपेक्षित असल्याचं सांगत निकालाचं स्वागत केलंय.

वासंती घैसास यांनी पत्राद्वारे आपली कैफीयत प्रसार माध्यमांकडे तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त, पालक मंत्री अजित पवार, शिवसेना नेत्या नीलम गोर्हे मनसे अध्यक्ष राज टाकरे यांच्याकडं मांडली सुशिक्षित आणि सुसंकृत समजल्या जाणार्‍या पुणे सहरात अनेक जागरूक नागरिकांच्या संघटना कार्यरत आहेत. प्रश्न एवढाच आहे की वासंती घैसास यांना आपण प्रतिसाद देणार की नाही. त्यांच्यापाठीमागे भरभक्कपणे उभारणार की नाही.

close