मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला दणका;सिंचन प्रकल्पाची चौकशी सुरु

September 22, 2012 9:54 AM0 commentsViews: 6

22 सप्टेंबर

सध्या गाजत असलेल्या दोन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिला आहे. सिंचन घोटाळ्याबाबात मुख्य अभियंता विजय पांढरे यांच्या पत्राची राज्यपालांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी राज्यपालांनी राज्य सरकारला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. चौकशीनंतर अहवाल राज्यपालांना सोपवण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. गेल्या 13 वर्षांपासून जलसिंचन खातं सांभाळणारी राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे आणखीणच अडचणीत आलीय. याशिवाय बहुचर्चीत महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांची खुली चौकशी होऊ शकते असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या प्रकरणाची तक्रार मुख्य सचिव जे के बांठिया यांच्याकडे सोपवण्यात आली असून मुख्य सचिव या तक्रारीवर ऍडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेणार आहेत. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी मुख्य सचिवांकडे सोपवून एक प्रकारे भुजबळांची खुली चौकशी सुरु केलीय असंच म्हणावं लागेल. आधीच गेल्या 6 सप्टेंबरपासून ऍन्टीकरप्शन ब्युरोनं भुजबळांची गुप्त चौकशी सुरु केलेली आहे.

close