केंद्रीय मंत्रिमंडळात पुढच्या आठवड्यात फेरबदल

September 21, 2012 5:14 PM0 commentsViews: 4

21 सप्टेंबर

यूपीए-2 सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात पुढच्या आठवड्यात शेवटचा फेरबदल होण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसच्या 6 मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे रिकाम्या होणार्‍या जागांमुळे हा फेरबदल होतोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तृणमूलचे मुकूल रॉय यांच्या जाण्यानं रिक्त होणारं रेल्वे मंत्री पद काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना मिळू शकतं. सध्या राज्यमंत्री असलेले तरूण नेते ज्योतीरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट यांना बढती मिळू शकते. तर काँग्रेसच्या पश्चिम बंगालमधून खासदार असलेल्या दीपा दासमुंशी यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे राज्यसभेतले खासदार रहेमान खान यांना अल्पसंख्याक मंत्रालयाची जबाबदारी मिळू शकते. काँग्रेसचे राज्यसभेतलेच आणखी एक खासदार अश्विनी कुमार यांनाही बढती मिळण्याची शक्यता आहे. तर दोन मंत्रिपद असलेल्या मंत्र्यांचं एक मंत्रालय काढून त्यांच्यावरचा ताण कमी होण्याची शक्यता आहे. विरप्पा मोईली यांच्याकडे ऊर्जा आणि कॉर्पोरेट अफेअर्स ही दोन मंत्रिपदं आहे. त्यापैकी कॉर्पोरेट अफेअर्स हे मंत्रिपद काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे. दाक्षिणात्य अभिनेते आणि प्रजाराज्यम पक्षाचे संस्थापक चिरंजीवी यांनाही मंत्रिपद मिळू शकतं. ग्रामविकास राज्यमंत्री अगाथा संगमा यांच्या जागी राष्ट्रवादीचे खासदार तारीक अन्वर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे आणि अखेरीस राहुल गांधींच्या विश्वासू मीनाक्षी नटराजन यांना राज्यमंत्रिपद मिळू शकतं. एकंदरीत मंत्रिमंडळ फेरबदल करताना काम आणि तरूण यावर यूपीएचा भर असेल.

close