सुपर-8 मध्ये आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी

September 28, 2012 9:48 AM0 commentsViews: 1

28 सप्टेंबर

टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर एटमध्ये भारताची आज गाठ पडणार आहे ती बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर ही मॅच खेळवली जाईल. या मॅचसाठी कॅप्टन धोणीनं इंग्लंडविरुद्धचा विजयी फॉर्म्युला कायम ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय. पण यामुळे वीरेंद्र सेहवागच्या टीममधल्या स्थानाबद्दल मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

भारताचा हा धडाकेबाज आणि अनुभवी बॅट्समन अंतिम अकरामध्ये स्थान मिळवू शकेल की नाही याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. वीरेंद्र सेहवाग सध्या पूर्णपणे तंदरुस्त आहे आणि खेळण्यासाठी सज्जही झाला आहे. पण कॅप्टन महेंद्रसिंग धोणी इंग्लंडविरुद्धच्या विजयी टीममध्ये कोणतेही बदल करण्यास इच्छूक नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्येही 6 बॅट्समन आणि 5 बॉलर हाच फॉर्म्युला कायम ठेवणार असल्याचं धोणीनं स्पष्ट केलंय.

ऑस्ट्रेलियानंही आपल्या मिशन टी-20 वर्ल्डकपची दणक्यात सुरुवात केली. स्पर्धेपूर्वी टी-20 क्रमवारीत खालच्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने ग्रुप मधल्या दोन्ही मॅच जिंकत टी-20 क्रिकेटमध्येही आपला दबदबा निर्माण केला आहे. आता भारताविरुद्धच्या लढतीसाठीही आपला हाच फॉर्म कायम ठेवण्यासाठी ते सज्ज आहेत. आणि मॅचपूर्वी त्यांनी माईंड गेमलाही सुरुवात केली आहे.

भारताच्या स्पीन बॉलिंगसमोर इंग्लंडची भंबेरी उडाली होती आणि आता ऑस्ट्रेलियाविरुध्दही स्पीन बॉलिंगच भारताचं प्रमुख अस्त्र असणार आहे. कॅप्टन धोणी अंतिम अकरामध्ये तीन स्पीन बॉलर खेळवण्याची शक्यता आहे. साहजिकच ऑस्ट्रेलियासमोर स्पीन बॉलिंग हिच प्रमुख समस्या असणार आहे.

टी-20 स्पर्धेत आतापर्यंत या दोन्ही टीम 6 वेळा आमने सामने आल्यात, आणि दोन्ही टीम प्रत्येकी तीन वेळा विजयी ठरल्यात.आता सुपर एटमध्ये विजय मिळवत आघाडी घेण्याबरोबरच सेमीफायनलमधलं स्थान पक्क करण्याचा या दोन्ही टीमचा प्रयत्न असेल.

close