‘अजित पवारांचा राजीनामा स्वीकारा’

September 27, 2012 10:09 AM0 commentsViews: 12

27 सप्टेंबर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा देऊन काँग्रेसला खिंडीत पकडले पण आता काँग्रेसने डाव उलटवण्याचा इरादा केला आहे. अजित पवार यांचा राजीनामा स्वीकारा असे आदेश काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस हायकमांडने अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा न करता आपला निर्णय घेतला आहे. शरद पवारांनीही राजीनाम्याचा विषय आमच्यासाठी संपला आहे असं विधान केलंय. त्यामुळे आता लक्ष मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर आहे.

सिंचन प्रकल्पावरुन होत असलेल्या आरोपामुळे व्यथित होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. अजितदादांच्या अचानक राजीनामास्त्रामुळे सर्वांना एकच धक्का बसला. या धक्क्याची 'ब्रेकिंग न्यूज' पोहचत नाही तोच राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनीही राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे देऊन टाकला. यामुळे राज्यातला राजकारण ढवळून निघाले. उलट सुलट चर्चाना एकच पेव फुटला. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारला कोणताही धोका नाही. राष्ट्रवादी सरकारमध्येच राहणार असं स्पष्ट त्यांनी केलं. दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांनीही आघाडी कायम राहिलं असं स्पष्ट केलं. काल बुधवारी राष्ट्रवादीची विधिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत अजित पवारांचा राजीनामा मागे घ्यावा असा ठराव मंजूर करण्यात आला आणि अंतिम निर्णय शरद पवारांवर सोपवण्यात आला. तिकडे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं अगोदरच स्पष्ट केलं होतं. आज काँग्रेस हायकमांडने अजित पवारांचा राजीनामा घेऊन टाका असे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले आहे. मात्र हे आदेश घेताना शरद पवार यांच्याशी चर्चा न करता निर्णय घेतल्यामुळे अजित पवार अडचणीत सापडले आहे. जर काँग्रेसने राजीनामा स्वीकाराला तर राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनीही राजीनामे दिले आहे. मग अजितदादांच्या पाठीशी राहुन राष्ट्रवादीचे मंत्री आपल्या राजीनाम्यावर ठाम राहतील का ? शरद पवार राजीनामा स्वीकारतील का ? यावर दादांची कसोटी लागणार आहे.

close