नितिन गडकरी दुसर्‍यांदा होणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

September 28, 2012 4:48 PM0 commentsViews: 17

सुमीत पांडे, हरियाणा

28 सप्टेंबर

नितिन गडकरी सलग दुसर्‍यांदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहे. त्यासाठी भाजपच्या घटनेत दुरुस्तीचा ठराव मंजूर करण्यात आलाय. घटनेत केलेल्या दुरुस्तीमुळे गडकरींचा सलग दुसर्‍यांदा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झालाय. हरियाणाच्या सुरजकुंड येथे भाजपची तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद सुरू आहे. आज या परिषदेत पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर भाजपचे माजी अध्यक्ष राजनाथसिंह आणि व्यंकय्या नायडू यांनी नितीन गडकरी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

लालकृष्ण अडवाणींची नाराजी असतानाही नितीन गडकरी भाजपचे दुसर्‍यांदा राष्ट्रीय अध्यक्ष बनणार आहेत. त्यासाठी हरियाणात सुरू असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घटनादुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दरम्यान, इतर पक्षांतल्या भ्रष्टाचारावर आपण जसं आक्रमक असतो तसेच पक्षातल्या भ्रष्टाचाराबाबतही कठोर असलं पाहिजे, असा टोला अडवाणींनी लगावला आहे.

नितीन गडकरी यांचा दुसर्‍यांदा भाजपचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झालाय. गडकरींना दुसर्‍यांदा अध्यक्ष होता यावं, यासाठी हरियाणात सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत राजनाथ सिंग यांनी पक्षाच्या घटना दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला आणि तो एकमतानं मंजूर करण्यात आला. गडकरींच्या भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ येत्या डिसेंबरमध्ये संपतोय. आणि आता ते दुसर्‍यांदा पक्षाध्यक्ष होणार आहेत. म्हणजे आगामी सार्वत्रिक निवडणूक भाजप गडकरींच्या नेतृत्त्वाखाली लढणार आहे.

गडकरींवरही सिंचन घोटाळ्याचे आरोप होत असताना त्यांना पुन्हा एकदा अध्यक्षपद मिळालंय, हे विशेष… आरटीआय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गडकरी आणि शरद पवार यांचे लागेबांधे असल्याचा आरोप केलाय. गडकरी यांनी दमानियांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. पण या आरोपांचे हादरे हरियाणातल्या सुरजकुंडमध्ये सुरू असलेल्या पक्षाच्या तीन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेतही जाणवले. गडकरींना अध्यक्षपदाची दुसरी टर्म द्यायला अडवाणींचा विरोध होता. सत्ताधार्‍यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आपण जेवढे आक्रमक असतो, तेवढेच आपल्या पक्षातल्या भ्रष्टाचाराबाबतही कठोर असलं पाहिजे या शब्दात त्यांनी गडकरी कॅम्पला टोला हाणला.

भाजपतल्या एका गटाचा विरोध असतानाही संघाच्या पाठिंब्यामुळे गडकरी पुन्हा एकदा भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. पण नेतृत्त्वाच्या वादात अडकलेल्या भाजपला लोकसभा निवडणुकीत गडकरी कसे तारणार, हा खरा प्रश्न आहे.

close