‘राज ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करा’

September 27, 2012 1:34 PM0 commentsViews: 2

27 सप्टेंबर

बिहारी लोकांना घुसखोर ठरवून राज्यातून हाकलून लावू असं विधान करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने दिला आहे. राज यांच्याविरोधात सब्जी मंडी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर तीस हजारी कोर्टात सुनावणी झाली यावेळी कोर्टाने हे आदेश दिले आहे.

मुंबई हिंसाचार प्रकरणाचा निषेध, गृहमंत्री आर.आर.पाटील आणि पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 31 ऑगस्टला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली गिरगाव ते आझाद मैदान मोर्चा काढण्यात आला होता. आझाद मैदानावर मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. यावेळी राज यांनी चौफेर फटकेबाजी केली. तसेच हिंसाचारातील दंगेखोरांना मुंबई पोलिसांनी बिहारामध्ये जाऊन अटक केली. पोलिसांच्या या कृत्यावर बिहारच्या सचिवांनी आक्षेप घेत पोलिसांवर अपहरणाचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत राज यांनी उत्तर भारतीयांवर टीका केली. जर पोलिसांना कारवाईचा इशारा देत असाल तर राज्यातील बिहारी लोकांना घुसखोर ठरवून हाकलून देऊ असा इशारा राज यांनी दिला होता. राज यांच्या विधानावर बिहारी नेत्यांनी सडकून टीका केली. राज यांच्यावर कारवाई करावी अशी एकमुखाने मागणी बिहारी नेत्यांनी केली होती. याच प्रकरणी राज ठाकरेंविरोधात बिहारमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. आज तीस हजारी कोर्टाने राज ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

close